विशाल मोघे यांच्या गायनाचा कार्यक्रम उद्या
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
विश्वविख्यात युवा शास्त्रीय गायक विशाल मोघे यांचा गायनाचा कार्यक्रम रविवार दि. 25 रोजी शहापूर येथील श्री विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. हेर्लेकर परिवारातफें कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या या कार्यक्रमात ग्वाल्हेर -आग्रा घराण्याचे वैशिष्ट्यापूर्ण गायन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
विशाल मोघे यांनी ग्वाल्हेर येथे प्रारंभी डॉ. स्मिता सहस्त्रबुद्धे आणि डॉ. जयंत खोत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर पंडित बाळासाहेब पूंछवाले, पंडित शरद साठे आणि सध्या ज्येष्ठ पंडित अरुण कशाळकर अशा महान विद्यानांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले आहे.
पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून त्यांनी अत्युत्तम श्रेणीतून एम. ए. पूर्ण केले आहे. सध्या त्याच संस्थेत ते अध्यापनही करतात. देशविदेशात त्यांचे अध्यापन सुरू असते. संगीत रंगभूमीवरही त्यांचे योगदान असून नृत्य समूह आणि सिनेसंगीतात त्यांचा सहभाग असतो. संस्कृती मंत्रालय आणि तानसेन अकादमी सारख्या संस्थांकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. देशभरातल्या महत्त्वाच्या समारोहात त्यांनी आपले गायन सादर केले असून अलीकडेच आर्ट्स सर्कलच्या मल्हार महोत्सवात त्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला यांना संवादिनीवर योगेश रामदास अणि तबल्यावर अंगद देसाई संगत करणार आहेत. रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
