विशाल मेगा मार्टचा आयपीओ लवकरच
11 डिसेंबर रोजी लाँच होणार : जवळपास 8,000 कोटी उभारण्याचे ध्येय
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सुपरमार्ट कंपनी विशाल मेगा मार्टचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (आयपीओ) 11 डिसेंबर रोजी सबक्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आयपीओमधील गुंतवणूक करण्याची संधी तीन दिवस असणार असून 13 डिसेंबर रोजी आयपीओ गुंतवणूकीसाठी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया 10 डिसेंबर रोजी संपणार आहे. विशाल मेगा मार्टचा आयपीओ प्राइस ब्रँड लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या आयपीओद्वारे सुमारे 8,000 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. आयपीओमध्ये प्रवर्तक समायत सर्व्हिसेस एलएलपी आपला हिस्सा विकेल. या आयपीओमध्ये कोणतेही नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. ही माहिती कंपनीने दाखल केलेल्या आपल्या अर्जात दिली आहे. सध्या, समायत सर्व्हिसेस एलएलपीची गुरुग्राम स्थित आयएस सुपरमार्ट कंपनीमध्ये 96.55 टक्के भागीदारी आहे.
हा आयपीओ पूर्णपणे ओएफएस असल्यामुळे कंपनीला त्यातून कोणताही निधी मिळणार नाही. आयपीओमधून जमा होणारा पैसा संपूर्णपणे शेअर्स विकणाऱ्या प्रवर्तकाकडे जाईल. विशाल मेगा मार्ट हे भारतातील मध्यम आणि निम्न-मध्यम उत्पन्न वर्गातील ग्राहकांसाठी पसंतीची खरेदीची शोरुम आहे. कंपनी तीन प्रमुख श्रेणींमध्ये उत्पादने ऑफर करते- कपडे, सामान्य व्यापार आणि जलद-मुव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी). यामध्ये इन-हाऊस आणि तृतीय-पक्ष ब्रँडचा समावेश आहे. 30 जून 2024 पर्यंत, कंपनी मोबाईल अॅप आणि वेबसाइटसह भारतात 626 मेगा मार्ट स्टोअर्स चालवते. या इश्यूसाठी बुक-रनिंग लीड मॅनेजर्समध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस, जेफरीज इंडिया, जेपी मॉर्गन इंडिया आणि मॉर्गन स्टॅनली इंडिया कंपनी यांचा समावेश आहे.