विशालच्या ‘छडीटांग’ने सिकंदरला आस्मान
केवळ 45 सेकंदात विशालचा प्रेक्षणीय विजय, हजारो शौकिन बेहद्द खूश, बनकर-बेळगाव केसरी, शिवा-बेळगाव रणवीर, दादा शेळके-बेळगाव शौर्य किताबाचे मानकरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात विशाल हरियाणाने महाराष्ट्राच्या रुस्तुमे हिंद सिकंदर शेखला केवळ 45 सेकंदात छडीटांग डावावर अस्मान दाखवून जमलेल्या 35 हजारांहून अधिक शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. प्रकाश बनकर, बेळगाव केसरी तर दादा शेळके बेळगाव शौर्य, शिवा महाराष्ट्रने रणवीर हा किताब पटकाविला. तर बेळगावच्या स्वाती पाटीलने हिमानी हरियाणाचा घिस्यावर पराभव करुन विजय संपादन केले.
रात्री 10.52 वाजता बेळगाव मल्ल सम्राट किताबाची कुस्ती रुस्तुमे हिंद सेकंदर शेख व हरियाणा केसरी विशाल हरियाणा ही कुस्ती पुरस्कर्ते नागेश छाब्रिया, सुमुख छाब्रिया, राम जामनानी, रमाकांत कोंडुसकर, अमर अकनोजी, डॉ. सोनवलकरसह इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत लागलीच सिकंदरने ताकद आजमविण्याचे भासून विशाल हरियाणावर चाल करुन हप्ते भरुन गेला असता विशाल हरियाणाने काकेत हात घालून पायाला अकडी लावत छडीटांग डावावरती केवळ 45 सेकंदात सिकंदरला आस्मान दाखवून विजयी घोडदौड खंडीत केली.
दुसऱ्या क्रमांकाची बेळगाव केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड आणि सोहेल इराण यांच्यात होती. पण महेंद्र गायकवाड जखमी असल्याने उपहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांच्यात ही कुस्ती झाली. ही कुस्ती जयभारत फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोहेल व बनकर यांच्यात झाली. तिसऱ्या मिनिटाला बनकरने एकेरी पट काढून सोहेलला खाली घेत सवारी घालून चित करण्याचा प्रयत्न केला. त्यातून सोहेलने सुटका करुन घेली. 12 व्या मिनिटाला प्रकाश बनकरने दुहेरीपट काढून सोहेलला खाली घेत एकलांगी भरुन सवारी भरत पुन्हा फिरविण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून सोहेलने सुटका करुन घेतली. वेळेअभावी ही कुस्ती गुणावर निकाली करण्याचानिर्णय घेतला. त्यात प्रकाश बनकरने एकेरीपट काढून सोहेलवर गुण मिळवित विजय मिळविला. त्याला जयभारत फौंडेशनतर्फे बेळगाव केसरी हा किताब देवून त्याचा गौरव करण्यात आला. बेळगाव शौर्य किताबासाठी हादी इराण व दादा शेळके ही कुस्ती मृणाल हेब्बाळकर, डॉ. सोनवलकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटाला दादा शेळकेने हादीला एकेरीपट काढून खाली घेत एकचाकवरती फिरविण्याचा प्रयत्न केला.
पण त्यातून हादीने सुटका करुन घेतली. आठव्या मिनिटाला दादा शेळकेने दुहेरीपट काढून खाली घेत हादीला उलटी डावावर चित करुन बेळगाव शौर्य हा किताब पटकाविला. बेळगाव रणवीर किताबासाठी झालेल्या लढतीत शिवा महाराष्ट्र उर्फ रवी चव्हाण व प्लॅटिन अमेरिकेचा प्रॅन्डीला ही कुस्ती उद्योजक अमर अकनोजी, रवी जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला शिवाने एकेरीपट काढून प्रॅन्डीलाला खाली घेत हाताचा कस चढवून चित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुस्ती शौकिनांनी कुस्ती न झाल्याचे सांगून पुन्हा कुस्ती खडाखडी सुरू केली. आठव्या मिनिटाला शिवाने दुहेरीपट काढून प्रॅन्डीला खाली घेत सवारी घालत पायाला अकडी लावत एकेरी हाताचा कस चढवून चित केले व बेळगाव रणवीर हा किताब मिळविला. आकर्षक कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व मिलाद इराण यांच्यात झाली. ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत चौथ्या मिनिटाला मिलाद इराणने एकेरीपट काढून कार्तिक काटेला खाली घेत घिस्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्तिकने खालून डंकी मारुन मिलादवर कब्जामिळविला. पायाला एकलांगी भरुन चित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण बलदंड शरीराच्या मिलादला फिरविणे कठीण गेले. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
या मैदानात एकमेव कुस्ती राष्ट्रीय चॅम्पियन स्वाती पाटील-कडोली व राष्ट्रीय चॅम्पियन हिमानी हरियाणा ही कुस्ती डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्याच मिनिटाला स्वातीने हिमानीला एकेरीपट काढून खाली घेत घिस्यावरती नेत्रदीप कामगिरी करत विजय मिळविला. सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी व विजय बिचकुले-गंगावेस ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंझली पण वेळेअभावी बरोबरीत सोडविली. सातव्या क्रमांकाच्या कुस्ती शिवानंद दड्डीने सत्पाल नागाटिळक-गंगावेसचा घुटण्यावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या प्रेम जाधवने संकेत पाटील-गंगावेसचा बाहेरील टांगेवर आस्मान दाखविले. कामेश कंग्राळीने संजय इंगळगीला निकाल डावावरती विजय मिळविला. दहाव्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील-कंग्राळी व शुभम सगर-पुणे ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंझली.
पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. त्याच प्रमाणे पृथ्वीराज पाटील, अल्लाबक्ष मुल्तानी, भरत गंदीगवाड, पार्थ कळुंद्रे, यल्लाप्पा निरवानट्टी, भूमीपुत्र मुतगा, सुफीयान राशिवडे, तेजस लोहार-राशिवडे, रामदास काकती, श्रीकांत शिंदोळी, साहील निट्टूर, विकास चापगाव, सागर जाफरवाडी, नचिकेत रणकुंडये, मयुर तीर्थकुंडये, राजू बिर्जे, सचिन, ओमकार राशिवडे, विनायक पाटील-येळ्ळूर, जय भांडवल, ओमकार पाटील-राशिवडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय संपादन केला. आखाड्याचे पंच म्हणून सुधीर बिर्जे, जोतिबा हुंदरे, बाळाराम पाटील, ए. जे. मंतुर्गे, महावीर पाटील, शिवाजी पाटील, विश्वनाथ पाटील, चेतन बुद्दन्नावर, कृष्णा पाटील-कंग्राळी, मारुती सातनाळे, कल्लाप्पा शिरोळ, मालोजी येळ्ळूर, अमरदीप पाटील, प्रकाश तुर्केवाडी, कृष्णा बिर्जे, रुपेश सावगांव, राजू कडोली, बबन येळ्ळूर, प्रशांत पाटील, प्रकाश पाटील, युसुब इटगी, प्रकाश मुधोळ, भाऊ पाटील यांनी काम पाहिले.
मनोरंज कुस्तीत देवा थापाची बाजी कुस्ती शौकिनांचे केले मनोरंजन
युट्यूबचा बादशहा देवा थापा व गुंडा हरिद्वारचा यांच्यात मनोरंजनाची कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला गुंडा हरिद्वार एकेरीपट काढून थापाला घेत घिस्यावर चित करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या जादुवरती थापाने जमिनीला पाठ न लागल्याने पुन्हा कुस्ती खडाखडी सुरू करण्यात आली. त्यानंतर थापाने गुंडाला कोलाट्या घालून शेवटी घुटण्यावरती चित करीत उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.