Vishalgad Fort : उरुसाला बंदी, विशाळगडावर अलोट गर्दी, पोलीसांचा कडक बंदोबस्त
गडावरील रहिवाशांना कुर्बानीसाठी जागा व वेळ ठरवून दिली आहे.
कोल्हापूर : उच्च न्यायालय आणि जिल्हा प्रशासनाने घातलेल्या अटी-शर्तींचे पालन करत विशाळगडावर बकरी ईद सण साजरी करण्यास सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांनुसार विशाळगडावर कुर्बानीसाठी परवानगी देण्यात आली आहे. गडावरील रहिवाशांना कुर्बानीसाठी जागा व वेळ ठरवून दिली आहे.
सकाळपासून किल्ले विशाळगडवरील मलिक रेहान बाबा दर्ग्यात दर्शनासाठी पर्यटक आणि भक्तांनी मोठी गर्दी केली. विशाळगड परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने गडाला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कोल्हापूर पोलिस प्रत्येक पर्यटक भक्तांची नोंद घेवून गाड्या पुढे सोडत आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी किल्ले विशाळगड येथे होणाऱ्या हजरत सय्यद मलिक रेहान बाबा दर्ग्यात साजऱ्या होणाऱ्या उरूसाला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता. गडावर उरूस साजरा केला जाऊ नये यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मागील वर्षी अतिक्रमणाच्या विषयावरुन विशाळगडावर दंगल झाली होती. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या सर्वांचा विचार करता उच्च न्यायालयाने विशाळगडावर उरूस साजरा करण्यासाठी बंदी घातली होती. मात्र विशाळगड ट्रस्टने गडावरील खासगी जागेत कुर्बानीला परवानगी मागितल्याने उच्च न्यायलयाने अटी व शर्थींसह गडावर सकाळी ९ ते ५ यावेळेत परवानगी दिली होती.
त्यानुसार प्रशासनाने गडावरील रहिवाशांना कुर्बानीसाठी जागा व वेळ ठरवून देण्यात आली आहे. कुर्बानीनंतर त्या जागेची स्वच्छता करणे, अवशेषांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधितांना देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
किल्ले विशाळगड येथील उरूसाला प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी पर्यटक आणि भाविकांना गडावर जाण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पहाटे पाच 5 वाजल्यापासूनच पर्यटक आणि भक्तांनी विशाळगडावर जाण्यासाठी मोठी गर्दी केली.
पोलीसांच्या कडक बंदोबस्तात टेबूर्नीवाडी फाटा परिसरातून विशाळगडाकडे गाड्या सोडल्या जात आहेत. गडाच्या पायथ्याशी पोलास दलामार्फत प्रत्येक भाविक आणि पर्यटकाटी तपासणी आणि नोंद ठेवली जात आहे. सायंकाळी 5 वाजायच्या आत गडावरुन खाली येण्याच्या सूचना देऊनच भाविकांना गडावर सोडले जात आहे.
जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशाळगडासह गेल्या वर्षी जिथे दंगल उसळली त्या गजापूर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार आणि पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली 100 पोलिस कर्मचारी, 40 होमगार्ड, 10 वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि दोन शीघ्र कृती दलाची पथके तैनात करण्यात आली आहे. केंबुर्णेवाडी येथील पोलिस नाक्यावरही 25 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त असून 1 ते 15 जूनपर्यंत गडावर बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.