For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकेत 2 लाख विदेशींचा व्हिसा रद्द होणार

06:48 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकेत 2 लाख विदेशींचा व्हिसा रद्द होणार
Advertisement

व्हिसा रद्द करण्याची सर्वात मोठी कारवाई ठरणार : पर्यटनाच्या नावावर येत आश्रयाची मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेचे प्रशासन 2 लाख विदेशी नागरिकांच्या बिझनेस (बी1) आणि पर्यटन व्हिसा (बी2) रद्द करण्याची तयारी करत आहे. पर्यटन आणि बिझनेस व्हिसा प्राप्त करत अमेरिकेत पोहोचलेले परंतु नंतर आश्रयाची मागणी करणाऱ्या लोकांवर प्रशासनाची नजर आहे. यात 2016-26 दरम्यान जारी करण्यात आलेले व्हिसा सामील आहेत. अमेरिकेचा विदेश विभाग आगामी आठवड्यांमध्ये याची घोषणा करू शकतो. जर असे घडले तर अमेरिकेच्या इतिहासात व्हिसा रद्द करण्याची ही सर्वात मोठी कारवाई ठरणार आहे.

Advertisement

काही लोक पर्यटन आणि बिझनेस व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात आणि मग येथेच राहण्यासाठी आश्रयाचा अर्ज करतात असे वक्तव्य अमेरिकेचे उपविदेशमंत्री क्रिस्टोफर लँडो यांनी केले आहे.  व्हिसा रद्द होण्याचा अर्थ व्यक्तीला त्वरित अमेरिकेतून बाहेर काढले जाणार असा नाही. संबंधित इसमाने अमेरिकेत आश्रयासाठी अर्ज केला असल्यास आणि त्याचे प्रकरण विचाराधीन असल्यास तो काही काळासाठी अमेरिकेत राहू शकतो. परंतु त्याचा टूरिस्ट (बी2) आणि बिझनेस (बी1) व्हिसा अमान्य राहणार आहे.

अमेरिकेच्या विदेश विभागाने व्हिसा रद्द होणाऱ्या लोकांची संख्या सांगण्यास नकार दिला आहे. अधिकाऱ्यांनुसार ही प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चालणार असल्याने संख्या बदलू शकते.

18 महिन्यांमध्ये 1.75 लाख व्हिसा रद्द

-बी1 व्हिसा व्यवसाय किंवा उद्योगाशी निगडित कामांसाठी दिला जातो. तर बी2 व्हिसा पर्यटन, नातेवाईकांना भेटणे किंवा उपचारासाठी जारी केला जातो.

-या व्हिसाधारकांपैकी किती जणांनी अमेरिकेत आश्रय मागितला आहे किंवा त्यांचा अर्ज विचाराधीन आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

-अमेरिकेच्या विदेश विभागानुसार मागील 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये सुमारे 1.75 लाख व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.

-गुन्ह्यांचे आरोप असलेले किंवा गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या लोकांना प्रदान करण्यात आलेला व्हिसा अमेरिकेच्या प्रशासनाने रद्द केला आहे.

-काही प्रकरणांमध्ये अमेरिकेच्या धोरणांच्या विरोधात हालचाली किंवा वक्तव्यांमुळे देखील व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एच-1बी व्हिसा शुल्काचा नवा प्रस्ताव

एच-1बी व्हिसाचे शुल्क वाढविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने सोमवारी शुल्कवाढीचा नवा प्रस्ताव जारी केला आहे. प्रस्तावानुसार एच-1बी व्हिसासाठी विदेशी कर्मचाऱ्यांना सुमारे 99 लाख रुपयांपर्यंतचे शुल्क भरावे लागू शकते. या प्रस्तावाला अधिकृत गॅझेटमध्ये प्रकाशित केले जाणार आहे. यानंतर 30 दिवसांपर्यंत सर्वसामान्य लोक, कंपन्या आणि अन्य संघटना स्वत:चे मत व्यक्त करू शकतील. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत नवे शुल्क लागू केले जाण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांचा निर्णय

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात एच-1बी व्हिसा शुल्काला सुमारे 1 लाख रुपयांवरून वाढत 95 लाख रुपये करण्याचा आदेश दिला होता. परंतु जून 2026 मध्ये अमेरिकेच्या एका संघीय न्यायालयाने त्या आदेशाला रद्द केले होते. अमेरिकेत दरवर्षी एच-1बी व्हिसाचे 85 हजार अर्ज मंजूर केले जातात. यातील सुमारे 70 हजार एच-1बी व्हिसा भारतीयांना प्राप्त होत असतात.

Advertisement
Tags :

.