भारतातील व्हिसा सेवा बांगलादेशकडून कार्यरत
दोन महिन्यांनंतर दिल्लीतील कार्यालयात सेवा सुरू
वृत्तसंस्था/ ढाका
भारत-बांगलादेश संबंधांमध्ये सुधार होण्यास प्रारंभ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाने शुक्रवारी भारतीय नागरिकांसाठी व्हिसा सेवा पुन्हा सुरू केल्या. बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तीन दिवसांनी हा निर्णय घेतला आहे. डिसेंबरमध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढल्यानंतर व्हिसा आणि कॉन्सुलर सेवा निलंबित करण्यात आली होती. आता संबंध सुधारण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
बांगलादेशकडून भारतीयांसाठी सर्व प्रकारच्या व्हिसा सेवा पुनर्संचयित करण्यात आल्या आहेत. बांगलादेश नवी दिल्लीतील सर्व व्हिसा सेवा लवकरच पुन्हा सुरू करेल, असे एक दिवस आधी एका वरिष्ठ भारतीय कॉन्सुलर अधिकाऱ्याने म्हटले होते. या संकेतांना आता मूर्त स्वरुप आल्याचे दिसून येत आहे.
डिसेंबरमध्ये भारतविरोधी युवा नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येनंतर दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. हादींच्या मृत्यूमुळे बांगलादेशात व्यापक निदर्शने झाली. या आंदोलनावेळी भारतविरोधी घोषणाही देण्यात आल्या होत्या. या निदर्शनांदरम्यान, अनेक हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर, दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव लक्षणीयरीत्या वाढल्यानंतर व्हिसा सेवा निलंबित करण्यात आल्या. आता ढाकामध्ये मोहम्मद युनूस यांना सत्तेवरून काढून टाकल्यानंतर आणि तारिक रहमान यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर, भारताशी संबंध सुधारण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दिल्लीत व्हिसा सेवा पुनर्संचयित करण्याचा निर्णय या दिशेने एक सुरुवातीचे पाऊल म्हणून पाहिला जातो.