For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्मयोग्याला केलेल्या कर्मातून कोणतीही अपेक्षा नसते

06:40 AM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
कर्मयोग्याला केलेल्या कर्मातून कोणतीही अपेक्षा नसते
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

भगवंत म्हणले, जो मनुष्य स्वत:ला कर्ता समजतो तो मी कर्म करतो किंवा त्याचा त्याग करतो असे म्हणतो परंतु त्याचे हे म्हणणे निरर्थक आहे कारण, जेवढे म्हणून कर्म घडत असते, तेवढे गुणांच्या अधीन असते. अमुक एक कर्म मी करणार नाही असे म्हणून माणसाने ते करायचे टाळले तरी इंद्रिये त्यांचे काम करतच असतात. जोपर्यंत नैसर्गिक कर्मे देहाकडून चालूच असतील तोपर्यंत मी कर्मत्याग करतो ह्या म्हणण्याला काहीच अर्थ रहात नाही. तो प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे सत्व, रज, तम हे शरीरातील गुण त्याच्याकडून कर्म करून घेत असतात. येथे माणसाच्या इच्छेला काडीचीही किंमत नसते. त्यामुळे माणसाची इच्छा असो वा नसो तो प्रकृतीच्या इच्छेनुसार आणि इच्छा, द्वेष, सुखदु:ख ह्या विकारांना बळी पडून कर्म करत राहतो. असे असूनही जे कर्माचा त्याग करू म्हणतात त्यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नसतो. अगदी कर्मे करून ज्याने निष्कामता साधलेली आहे असा मनुष्यही जो पर्यंत त्याचा शरीराशी संबंध असतो तोपर्यंत कर्मे करत असतो.

काही लोक आम्ही संयमाने इंद्रिये ताब्यात ठेवली आहेत त्यामुळे ती आमच्या मर्जीनुसार वागतात असे सांगत असतात. त्यांचा तो समज कसा चुकीचा आहे ह्याबद्दल भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत. ते म्हणतात, जो केवळ कर्मेंद्रियांना जबरदस्तीने गप्प बसवतो आणि मनात विषयांचे चिंतन करीत असतो, त्याला अज्ञानी किंवा ढोंगी असे म्हणतात.

Advertisement

इंद्रिये करिती कर्म मूढ त्यास चि रोधुनी । राहतो भोग चिंतूनि तो मिथ्याचार बोलिला ।। 6 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, जे लोक आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचा त्याग करण्यासाठी मनावर दडपण आणतात पण त्यांचे अंत:करण विषयसेवनाची इच्छा करतच असते. त्यामुळे कर्मत्यागाचा त्यांनी आणलेला आव वरवरचा असतो.

ज्याने विकारांवर मात करून इंद्रियांना ताब्यात ठेवले आहे अशा विषयसेवनाची आवड नसलेल्या पुरुषाची लक्षणे पुढील श्लोकात भगवंत सांगत आहेत. ते म्हणाले,

जो इंद्रिये मनाने ती नेमुनी त्यास राबवी । कर्म-योगात नि:संग तो विशेष चि मानिला ।। 7 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, माणसाला केलेल्या कर्मातून विषयांचा उपभोग मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र कर्मयोगी कसलीही अपेक्षा करायची नाही ह्याबद्दल दृढनिश्चयी असतो. त्यामुळे त्याला केलेल्या कर्मातून आपल्याला विषयांचे आकर्षण वाटेल अशी भीती नसते. जेव्हा कर्तव्य म्हणून काम करायची वेळ येते तेव्हा तो अंगचोरपणा करत नाही. केलेल्या कर्मातून फळाची अपेक्षा नसल्याने विकारही त्याला त्रास देत नाहीत. तो निर्मोही असल्याने कधीही चुकीचे कर्म करत नाही. कमळाचे पान पाण्यात राहूनही कोरडेच असते. त्याप्रमाणे तो प्रपंचामध्ये अलिप्त होऊन राहतो. दिसण्यास सामान्य लोकांप्रमाणे दिसतो पण मनाने निरपेक्ष असतो. वरवर दिसण्यावरून त्याचे वास्तव स्वरूप कळू शकत नाही. अशा लक्षणांनी युक्त असलेला मनुष्य आशा-पाशरहित व मुक्त आहे, असे तू समज. अर्जुना! तोच खरा कर्मयोगी होय. या जगात त्याचीच स्तुती होत असते. म्हणून, तू असा कर्मयोगी हो. त्यासाठी तू कर्म करून फळाची अपेक्षा करायची नाही आणि कर्तव्य करून झाल्यावर अलिप्त रहायचे असा मनाचा निग्रह कर म्हणजे तू अंत:करणात स्थिर होशील. मग कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करत राहिली तरी फरक पडत नाही.

क्रमश:

Advertisement
Tags :

.