For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीरेश बोरकर हे खरे तर ‘बल्लाळदेव’

11:57 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
वीरेश बोरकर हे खरे तर ‘बल्लाळदेव’
Advertisement

गोवा फॉरवर्डचा आरजीपी आमदारावर पलटवार : विजय सरदेसाई हे भाजपला प्रमुख अडथळा

Advertisement

मडगाव : ‘आरजी’चे आमदार वीरेश बोरकर यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना ‘कटाप्पा’ असे म्हटल्यानंतर गोवा फॉरवर्डचे नेते विकास भगत यांनी त्यांच्यावर पलटवार करताना वीरेश बोरकर यांनी ‘बाहुबली’ सिनेमा पाहिलेला नाही असे वाटते. त्या सिनेमातील कटाप्पा हे पात्र निष्ठावान आहे. उलट बल्लाळदेव हे पात्र स्वार्थी असून आजपर्यंतची वीरेश यांची भूमिका पाहिल्यास त्यांना ‘बल्लाळदेव’ हेच नाव शोभते, असा टोला त्यांनी हाणला आहे. भगत यांनी बोरकर यांचा समाचार घेताना सांगितले की, ‘बाहुबली’ सिनेमात बल्लाळदेव हा आपल्याला राज्य मिळावे यासाठी आपल्याच कुटुंबियांशी दगा करतो, तर कटाप्पा हा शेवटपर्यंत कुटुंबाशी निष्ठावंत राहतो. यापूर्वी वीरेश बोरकर यांनी कुडका, बांबोळी आणि तळावली येथे जी मोठ्या प्रमाणात डोंगरकापणी झाली होती त्यावर आवाज उठविला होता. मात्र नंतर त्यांचा आवाज बंद का झाला ते कळत नाही. उलट विजय सरदेसाई हे कटाप्पाप्रमाणे गोवा आणि गोव्याच्या पर्यावरणाप्रती निष्ठावंत आहेत, हे बोरकर यांनी जाणून घ्यावे. ‘आरजी पक्ष’ हा मुळातच भाजपने जन्माला घातलेले बाळ असून आजवर या बाळाला भाजपनेच पोसले आहे हे सर्व गोव्याला माहीत आहे. त्यामुळेच काल उमेदवारी अर्ज भरल्यानंतर या पक्षाच्या उमेदवारांनी भाजपवर टीका न करता इंडिया आघाडीच्या घटकांवर टीका करणे पसंत केले. दक्षिण गोव्यात भाजपला विजय सरदेसाई हे प्रमुख अडथळा ठऊ शकतात याची जाणीव असल्यामुळेच भाजपच्या सांगण्यावरून बोरकर यांनी विजय यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे, असा आरोप त्यांनी केला.

म्हादई प्रश्नावर ‘आरजी’ची दुटप्पी भूमिका

Advertisement

म्हादईसाठीच्या आंदोलनासंदर्भात बोलताना भगत यांनी ‘आरजी’च्या दुटप्पीपणावर टीका केली. ‘आरजी’ने म्हादईच्या प्रश्नावर जी सभा बोलावली होती त्या सभेत त्यांनी भाजपावर नव्हे, तर आप व काँग्रेस पक्षावर टीका केली. उलट सर्व पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जी विराट सभा घेतली त्या सभेला आरजीने गैरहजर राहणेच पसंत केले. यावरून आरजीचे म्हादईप्रेम कसले ते कळून येते, असे भगत म्हणाले.

Advertisement
Tags :

.