जाहीर माफी मागावी, अन्यथा फौजदारी कारवाई; आमदार विरेश बोरकर यांचा अजय खोलकरांना इशारा
पणजी : 'तुला संपवेन, जीवनातून उठवेन', अशी हीन भाषा आम्ही उच्चारत नाहीत. अजय खोलकर यांच्या तोंडीच ती चांगली शोभते. त्यामुळे माझ्या राजकीय भवितव्याची चिंता त्यांनी करू नये. ज्याचा देव आणि दैवावर विश्वास आहे, त्याला कुणीही संपवू शकत नाही. मला लोकांनी निवडून दिलेले आहे आणि तेच माझे राजकीय भवितव्य ठरवणार आहेत, अशा शब्दात सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी खोलकर यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काल पणजीत जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली असताना ते पत्रकारांशी बोलत होते. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षात सध्या आमदार बोरकर व अजय खोलकर यांच्यात तुंबळ संघर्ष निर्माण झाला आहे. त्यातून आरोप, प्रत्यारोप, बदनामीकारक अवमानकारक वक्तव्ये, अशी लढाई सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार बोरकर यांनी वरील वक्तव्य केले आहे.
पुढे बोलताना बोरकर यांनी, मतदारांना आपले कार्य आणि कार्यपद्धती यांची पूर्ण जाणीव असल्याचे सांगितले. पाच वर्षात आम्ही कधीच हॉलिडे मूडवर गेलेलो नाही. सदैव जमिनीवर पाय ठेवून आहोत. गावातच आहोत, लोकांसोबत आहोत. जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सध्याची खेळी पाहता आमचे हे कार्य विरोधकांच्या डोळ्यांना खुपत असल्याचे दिसून येते, अशी टीका बोरकर यांनी केली.
दरम्यान, खोलकर यांनी बोरकर आणि पक्षाच्या अध्यक्ष शविना शिरोडकर यांना उद्देशून प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केलेली कथित बदनामीकारक विधाने, आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप आणि प्रतिमा मलिन करणाऱ्या अपमानास्पद टिप्पणी यांच्या विरोधात बोरकर यांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून खोलकर यांना ६ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.
तत्पूर्वी पुढील तीन दिवसांच्या आत बिनशर्त, स्पष्ट आणि जाहीर माफी मागण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने किंवा आरोप करू नयेत असेही बजावण्यात आले आहे. या मागण्यांची पूर्तता न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
