भारतीय व्हॉलीबॉलचे फेडरशनचे नवे अध्यक्ष वीरेंदर कंवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शनिवारी येथे झालेल्या बहुप्रतिक्षीत निवडणुकीत नागालँडचे प्रेमसिंग बाजोर यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव करून हिमाचल प्रदेशचे वीरेंदर कंवर व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष बनले आहे.
वीरेंदर कंवर यांना 33 मते मिळाली, त्यांचे प्रतिस्पर्धी बाजोर यांच्यापेक्षा दोन जास्त मते मिळल्यांने वीरेंदर कंवर यांची निवड झाली.तर या निवडणुकीतील तिसरे उमेदवार बिहारचे आनंद शंकर यांना एकही मत मिळाले नाही. राजस्थानचे रामानंद चौधरी हे महाराष्ट्राचे नीलेश जगताप यांना चार मतांनी हरवून 33 मते मिळवित नवे सरचिटणीस झाले. तेलंगणाचे एन.व्ही. हणमनाथ आणि आसामचे सुशांत बिस्वा यांना उपाध्यक्षपदाच्या लढतीत प्रत्येकी 36 मते मिळाली, तर हरि सिंह चौहान (मध्य प्रदेश) यांनी कोषाध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. आनंद शंकर आणि कुलदीप वत्स यांनी दोन्ही संयुक्त सचिवपदे जिंकली. बिनॉय जोश, मिथलेश कुमार, उत्तम राज, एस. रामादासे आणि पार्थ दास यांची कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवड झाली. रोहित राजपाल, स्टीफन बॉक (एफआयव्हीबी प्रतिनिधी) आणि हितेश मल्होत्रा (एफआयव्हीबी सक्षमीकरण प्रमुख) यांचा समावेश असलेली तीन सदस्यीय समिती निवडून आलेल्या पॅनेलला पाठिंबा देतील. राजपाल निवडणुकीपर्यंत फेडरेशनचे कामकाज सांभाळणाऱ्या अॅड-हॉक पॅनेलचे अध्यक्ष देखील होते. न्यायालयाने नियुक्त केलेले रिटर्निंग ऑफिसर न्यायमूर्ती पी. कृष्णा भट (निवृत्त) यांनी मतदान घेतले ज्यामध्ये क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिंपिक संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल फेडरेशनचे (एफआयव्हीबी) प्रतिनिधी देखील निरीक्षक म्हणून उपस्थित होते.