‘विराट’ विजय
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत टीम इंडियाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाचा धक्का देऊन पुढचे पाऊल टाकले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांमधील सामना हा एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. दोन्ही संघातील खेळाडूही प्रत्येक सामन्यात सर्वस्व पणाला लावून खेळत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे नेहमीच भारत आणि पाक यांच्यातील लढत उत्कंठावर्धक होते. रविवारचा सामनाही याला अपवाद नव्हता. मागच्या अनेक दिवसांपासून भारताचा स्टार फलंदाज किंग कोहली तसेच कर्णधार रोहित शर्मा यांच्या कामगिरीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. विराट आणि रोहित युग आता संपले येथपासून ते त्यांनी निवृत्ती घ्यायला हवी, येथपर्यंत या चर्चांचा सूर टीपेला पोहोचल्याचे दिसून आले. तथापि, अनुभव आणि दर्जा किती महत्त्वाचा असतो आणि मोक्याच्या सामन्यात त्याचा संघाला कसा उपयोग होतो, हेच त्यांनी दाखवून दिल्याचे दिसते. विराट कोहली हा मागच्या अनेक वर्षांपासून भारतीय संघाचा आधारस्तंभ म्हणून आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर विराटनेही विविध विक्रमांना गवसणी घालतानाच संघाच्या विजयात वेळोवेळी मोलाचा वाटा उचलला आहे. पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यात खणखणीत शतकासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा ओलांडत विराटने आणखी एक शिखर सर केल्याचे पहायला मिळते. फॉर्म इज टेंपररी, क्लास इज परमनंट, अशी क्रिकेटमध्ये एक म्हण आहे. ही म्हण विराटच्या कामगिरीला तंतोतंत लागू पडते. कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात चढ उतार, हे असतातच. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांसारख्या महान खेळाडूंनाही बॅडपॅच चुकला नाही. त्यामुळे बॅडपॅच आला म्हणजे निवृत्तीचा निर्णय घेतला पाहिजे, हे आततायीपणाचे मतप्रदर्शन ठरते. खरे तर विराट कोहलीमध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक आहे. त्याचा फिटनेसही चांगला आहे. हे बघता आणखी तीन ते चार वर्षे तो आरामात क्रिकेट खेळू शकतो, असे म्हणता येईल. मुख्य म्हणजे कसोटी, टी ट्वेंटी आणि एकदिवसीय अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळण्यासाठी लागणारी कौशल्ये विराटमध्ये दिसतात. यातील टी टवेंटीमधून त्याने आधीच निवृत्ती घेतली आहे. मुळात किंग कोहली हा क्लासिकल बॅटस्मन आहे. त्याच्याकडे स्वतंत्र शैली आहे. पदलालित्य आहे. अवघडातल्या अवघड चेंडूचा सामना करीत दोन क्षेत्ररक्षकांमधून चौकार कसा फटकवायचा किंवा कोणतीही संधी न देता पुढे सरसावत षटकार कसा ठोकायचा, याचे त्याच्या जवळ असलेले तंत्र अफलातून होय. बरे या सगळ्या धडाक्यातही एकेरी, दुहेरी धावा घेण्यासाठी लागणारी असाधारण चपळाईही त्याच्या ठायी दिसते. अशा विराटला काही सामन्यांमध्ये अपयश यावे आणि त्यावरून क्रिकेटमधील ढुढ्ढाचार्यांनी उठता बसता टोमणे मारावेत, हे तसे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे. तथापि, या साऱ्याला शांतपणे सामोरे जात विराटने टीकाकारांना आपल्या बॅटनेच चोखपणे उत्तर दिल्याने त्याची प्रतिभा आणखी चकाकली, असे म्हटल्यास ते अतिशयोक्त ठरू नये. कर्णधार रोहित शर्माबाबतही असेच म्हणता येईल. रोहित हा भारताचा अत्यंत स्फोटक फलंदाज मानला जातो. मागच्या काही सामन्यात त्याच्या भात्यातून धावांची बरसात झाली नाही, हे खरेच. तथापि, त्यावरून त्याला निवृत्तीचा सल्ला देणे कितपत योग्य आहे, याचा विचार केला पाहिजे. रोहितने 2023 च्या वन डे वर्ल्डमध्ये आपल्याला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले. तर टी ट्वेंटी वर्ल्ड कपही भारताला थाटात मिळवून दिला. इंग्लंडविऊद्धच्या सामन्यातील त्याचे शतक त्याला मॅचविनर का म्हणतात, हे सांगण्यासाठी पुरेसे असावे. चँपियन ट्रॉफीत भले त्याने अद्याप मोठी खेळी नसेल. मात्र, भारताला तो ज्या पद्धतीने सुऊवात करून देतो, ती निर्णायक ठरत असल्याचे दिसून येते. कर्णधार म्हणूनही त्याची चतुराई वाखणण्याजोगी म्हणता येईल. सध्या भारताचा दुसरा सलामीवीर शुभमन गिल हाही भलत्याच फॉर्ममध्ये दिसतो. शुभमनमध्येही प्रचंड गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याची चुणूक इग्लंडविऊद्धची मालिका आणि चँपियन्स ट्रॉफीमधील दोन्ही सामन्यात दिसून आली. आता पुढच्या सामन्यात भारताच्या या दोन शिलेदारांसह शुभमनचा खेळही असाच उंचावत राहील, अशी अपेक्षा असेल. श्रेयस अय्यर हादेखील सध्या चौथ्या क्रमांकावर स्थिरावला आहे. वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावरील खेळाडूची आपल्याला मोठी उणीव जाणवली होती. हे बघता श्रेयसची कामगिरी आश्वासक वाटते. 2024 मध्ये उसळत्या चेंडूंनी त्याला बरेच सतावले. तथापि, स्थानिक पातळीवरील क्रिकेटने त्याला आत्मविश्वास दिल्याचे दिसून येते. म्हणूनच स्थानिक पातळीवरील क्रिकेटपासून खेळाडूंनी दूर जाऊ नये. याशिवाय के. एल. राहुल, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, शमी, कुलदीप यादव असे सगळेच भारतीय क्रिकेटपटू आज चांगल्याच लयीत दिसतात. ही लय त्यांना पुढच्या सामन्यांमध्येही कायम ठेवावी लागेल. पाकिस्तानवरील विजयाने भारताचा उपांत्य फेरीतील समावेश निश्चित मानला जातो. तथापि, या दोन विजयाने हुरळून न जाता भारतीय संघाला मार्गक्रमण करावे लागले. मागच्या काही सामन्यांमध्ये भारतीय क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा उणिवा जाणवल्या. सोप्यात सोपे झेल भारतीय खेळाडूंनी सोडल्याचे बघायला मिळाले. मात्र, कोणताही सामना जिंकायचा असेल, तर फलंदाजी, गोलंदाजीइतकाच क्षेत्ररक्षण हा घटक महत्त्वाचा असतो, हे विसरता कामा नये. त्यादृष्टीने भारतीय संघाने अंग झोकून द्यायला हवे. कुठे कधी थांबायचे, हे प्रत्येक खेळाडूला कळते. सचिनपासून धोनीपर्यंत अनेक महान खेळाडूंनी वेळ आली, तेव्हा सन्मानाने निवृत्ती घेतली. म्हणून अशा चर्चांऐवजी सर्वांनी केवळ खेळाचा आनंद लुटावा.