विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 16 वर्षे पूर्ण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवासाला रविवार 18 ऑगस्ट 16 वर्षे पूर्ण झाली. एक आश्वासक तरुण खेळाडू म्हणून सुरुवातीच्या दिवसांपासून ते इतिहासातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक बनण्यापर्यंत कोहलीची कारकीर्द विलक्षण टप्प्यांनी भरलेली आहे. या टप्प्यांनी खेळावर अविट छाप सोडली आहे.
2008 मध्ये कोहलीची सुऊवात 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करून झाली. या यशाने तो केवळ प्रसिद्धीच्या झोतात आला नाही, तर वरिष्ठ राष्ट्रीय संघात त्याच्या प्रवेशाचा मार्गही मोकळा झाला. कोहलीने 18 ऑगस्ट, 2008 रोजी वयाच्या 19 व्या वर्षी श्रीलंकेविऊद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणात त्याने फक्त 12 धावा केल्या होत्या. परंतु पुढे एकदिवसीय सामन्यांतील कोहलीच्या सातत्याने त्याला संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले जाऊ लागले.
कोहलीने पहिले एकदिवसीय शतक 2009 साली श्रीलंकेविऊद्ध झळकावले. तसेचा एकदिवसीय सामन्यांमध्ये 8 हजार, 9 हजार, 10 हजार, 11 हजार व 12 हजार धावांचे टप्पे सर्वांत जलद गाठण्याचा विक्रम या प्रकारातील त्याचे वर्चस्व दाखवितो. कोहलीची क्षमता एकदिवसीय सामन्यांच्या पलीकडे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत आणि इंडियन प्रीमियर लीगमध्येही दिसून आलेली आहे.
त्याने टी-20 प्रकारात 2010 साली झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले आणि लवकरच तो या सर्वांत लहान प्रकारातील महत्वाचा खेळाडू बनला. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचे नेतृत्व करताना कोहली हा स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक राहिला. 2016 च्या मोसमात त्याने काढलेल्या विक्रमी 973 धावा कुणाला मागे टाकता आलेल्या नाहीत. 2011 मध्ये वेस्ट इंडिजविऊद्ध पदार्पण केलेल्या कोहलीचा कसोटी क्रिकेटवरील प्रभाव तितकाच खोल आहे.
कोहलीने पहिले कसोटी शतक 2012 साली अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध झळकावले. कसोटीत भारतीय खेळाडूंमध्ये सर्वांत जास्त 7 द्विशतके नोंदविण्याचा विक्रम त्याच्या नावावर असून कर्णधार म्हणून कोहलीचा कार्यकाळही असंख्य ऐतिहासिक विजयांनी आणि संघाच्या कार्यपद्धतीत परिवर्तनाने सजलेला आहे. 2014 मध्ये कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोहलीने भारताला 2018-19 हंगामात ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक पहिलावहिला मालिका विजय मिळवून दिले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल आणि 2019 च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली.
? एकदिवसीय सामन्यांमध्ये दुसऱ्या डावात सर्वाधिक 27 शतके
? सर्वांत वेगाने 70 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद
? सर्व प्रकारांत मिळून 80 आंतरराष्ट्रीय शतके
? वनडे इतिहासात 50 शतके करणारा पहिला फलंदाज
? एका टप्प्यावर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता
? दिवस-रात्र कसोटीत शतक नोंदविणारा पहिला भारतीय खेळाडू