विराट आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू
तब्बल 230 कोटी रुपयांची कमाई : 10 फ्रँचायझींचे एकत्रित मूल्य 1.63 लाख कोटी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाकडून 230 कोटी रुपये कमावून विराट कोहली 18 वर्षांच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे. मंगळवारी याबाबत अहवाल प्रसिद्ध झाला आहे. पॅनॅटिक स्पोर्ट्स आणि हुऊन यांच्या अहवालानुसार, इंडियन प्रीमियर लीगच्या सर्व 10 फ्रँचायझींचे एकत्रित मूल्यांकन 1.63 लाख कोटी रुपये आहे. आयपीएलच्या सर्वकालीन कमाईमध्ये कोहलीनंतर 227.2 कोटी रुपयांसह रोहित शर्मा आणि 200 कोटी रुपयांसह महेंद्रसिंग धोनी यांचा क्रमांक लागतो.
या अहवालानुसार, शाहरुख खानच्या मालकीचा कोलकाता नाईट रायडर्स संघ 19,200 कोटी ऊपयांपेक्षा जास्त मूल्यांकनासह आघाडीवर आहे. त्यानंतर अंबानींच्या मालकीचा मुंबई इंडियन्स 18,400 कोटी रुपयांसह आणि चेन्नई सुपर किंग्स 18,400 कोटी रुपयांसह दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फ्रँचायझींमध्ये सौदेबाजीमध्ये वाढलेल्या स्वारस्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या अहवालानुसार, विशेष म्हणजे, आयपीएल संघाचे सरासरी मूल्यांकन सध्याच्या 1.8 अब्ज अमेरिकी डॉलरवरून 2032 पर्यंत 15 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
महिला क्रिकेट आणि हॉकीपटूंची कमाई
महिला क्रिकेटपटूंमध्ये, स्मृती मनधाना आतापर्यंतच्या एकूण 13.7 कोटी रुपयांच्या कमाईसह वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये अव्वल स्थानी आहे. अव्वल 10 महिला खेळाडूंनी आतापर्यंत फक्त 90 कोटी रुपये कमावले आहेत. देशाचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीच्या बाबतीत, हे फरक आणखीच स्पष्ट आहेत. अहवालानुसार, हॉकी इंडिया लीगमध्ये डिफेंडर हरमनप्रीत सिंग 78 लाख रुपयांसह सर्वाधिक कमाई करतो. त्यानंतर फॉरवर्ड अभिषेक नैन 72 लाख रुपये आणि मिडफिल्डर हार्दिक सिंग 70 लाख रुपये कमावतो.