रत्नागिरीत प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे काढला विराट आक्रोश मोर्चा
पालक, शिक्षक व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने वाडी-वस्ती व तांडा आणि ग्रामीण भागातील बहुजन समाजाचे शिक्षण वाचविण्यासाठी आज (२५ सप्टेंबर) विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. शहरातील माळनाका येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होउन तो जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला.
या मोर्चाद्वारे १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय रद्द करावा. दि. १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा. शिक्षणसेवक पद रद्द करा. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी निवासाची सक्ती रद्द करा. राज्यातील शिक्षकांना १०-२०-३० सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करावी. सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी मिळावी. अनुकंपा तत्त्वावर नियुक्त शिक्षकांना TET अनिवार्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. शैक्षणिक-अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. शासनाने या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.