For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले; एकाच इमारतीत वर्षभरात मृत्यूच्या तीन घटना

10:30 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
खळबळजनक  बंद फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले  एकाच इमारतीत वर्षभरात मृत्यूच्या तीन घटना
Advertisement
विरार : विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरात एका बंद फ्लॅटमध्ये दोन भाऊ आणि त्यांच्या बहिणीचे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कुमार मनसुखलाल मेहता (वय ५०), दिपेश मनसुखलाल मेहता (वय ५२) आणि खेवणा मनसुखलाल मेहता (वय ४८) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचा मृत्यू विषप्राशनामुळे झाला असावा, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही घटना विरार पश्चिमेतील ग्लोबल सिटी परिसरातील गार्डन अॅव्हेन्यू इमारतीच्या डी विंगमधील के-३-डी, फ्लॅट क्रमांक १२०३ येथे उघडकीस आली. संबंधित फ्लॅट अनेक तास बंद असल्याने आणि त्यातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने इमारतीतील रहिवाशांना संशय आला. त्यांनी याबाबत सोसायटीच्या सचिवांना माहिती दिली. त्यानंतर बोळींज पोलिसांना कळविण्यात आले.

Advertisement

माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटची पाहणी केली असता आत तिघांचे मृतदेह आढळून आले. प्राथमिक तपासात मृत व्यक्ती सख्खे भाऊ-बहीण असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकाला कर्करोग; आर्थिक अडचणींचीही माहिती

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत भावंडांपैकी एक जण कर्करोगाने ग्रस्त होता. तसेच मेहता कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर तिघांच्या मृत्यूमागे काही कौटुंबिक किंवा आर्थिक कारण असण्याची शक्यता तपासली जात आहे. विषप्राशनाचा संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी शवविच्छेदन अहवाल आणि इतर तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे संकलित

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी फ्लॅटमध्ये पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन आवश्यक पुरावे गोळा केले आहेत. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूच्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी बोळींज पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.

एकाच इमारतीत वर्षभरात मृत्यूच्या तीन घटना

दरम्यान, ग्लोबल सिटीतील संबंधित इमारतीत गेल्या वर्षभरात अशा प्रकारच्या मृत्यूच्या तीन घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी दहावीच्या एका विद्यार्थ्याचा इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला होता. आता तीन भावंडांचे मृतदेह एकाच फ्लॅटमध्ये आढळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या तिन्ही भावंडांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला आणि त्यामागे कोणते कारण होते, याचा तपास बोळींज पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :

.