व्हायरल ध्वनिफितीवरून खळबळ
गृहनिर्माण खात्यात भ्रष्टाचाराचा आरोप : काँग्रेस आमदाराचा स्वपक्षाच्या सरकारवर आघात : भाजप, निजदकडून
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक राज्य नीति आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, काँग्रेसचे आमदार बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण खात्यात व्यापक भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलेली ध्वनिफित शुक्रवार 20 जून रोजी व्हायरल झाली आहे. ध्वनिफितीमध्ये बी. आर. पाटील यांनी माझ्याजवळ असलेली माहिती उघड केली तर काँग्रेसच्या सरकारचा पायाच डळमळीत होईल, असे म्हटले आहे. या ध्वनिफितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. दरम्यान, भाजप व निजदने राज्य सरकारवर आरोपांचा भडिमार सुरू करत गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद विधानसभा मतदारसंघातील आमदार बी. आर. पाटील हे मंत्री जमीर अहमद खान यांचे स्वीय सचिव सर्फराज खान यांच्याशी फोनवर संभाषण करतानाची ध्वनिफीत उघड झाली आहे. त्यात त्यांनी आपल्या मतदारसंघातील खेड्यांमध्ये गृहनिर्माण योजनेतील घरांचे वाटप करण्यासाठी पैसे घेतले जात असल्याबद्दल संताप व्यक्त केला
व्हायरल ध्वनिफितीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तसेच अनेक परखड प्रश्न उपस्थित केले आहेत.
लाच देणाऱ्यांनाच घरांचे वाटप केले जात आहेत. माझ्या स्वत:च्या पक्षाच्या सरकारविरुद्ध तक्रार करण्यास मला वाईट वाटत आहे. लाभार्थ्यांकडून पैसे घेऊन विविध गावांमध्ये एकूण 950 घरांचे वाटप करण्यात आले आहे. माझ्या शिफारस पत्राकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याऐवजी ग्रामपंचायत अध्यक्षांनी सादर केलेल्या यादीला प्राधान्य देण्यात आले आहे, असेही बी. आर. पाटील यांनी म्हटले आहे.
फोनवरील संभाषणावेळी सर्फराज खान हे आमदार बी. आर. पाटील यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. तुमच्याजवळ असणारी यादी द्या, त्यांनाही घरांचे वाटप केले जाईल, असे आश्वासन सर्फराज खान यांनी दिल्याचे ध्वनिफितीतून उघड झाले आहे.
सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न
ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर आमदार बी. आर. पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काँग्रेस पक्षाकडूनही अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, कर्नाटक भाजपने ध्वनिफितीवरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस सरकार भ्रष्टाचारला पाठिंबा देत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
जमीर अहमद यांनी राजीनामा द्यावा : आर. अशोक
विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, काँग्रेसचे आमदार व मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरे•ाr यांनी यापूर्वी काँग्रेस सरकार भ्रष्टाचारात नंबर वन असे म्हटले होते. या विधानाला पुष्टी म्हणून आमदार बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे जमीर अहमद यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आर. अशोक यांनी केली आहे.
प्रत्येक खात्यात कमिशन : कुमारस्वामी
राज्य सरकारमध्ये प्रत्येक टप्प्यात कमिशन आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट आहे. सरकारमध्ये काय चालले आहे, याला आमदार बी. आर. पाटील यांचे संभाषणच पुरावा आहे. त्यांनी फोनवर केलेले संभाषण प्रसिद्धी माध्यमांवर प्रसारित झाले आहे. सरकारच्या सर्वच खात्यांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.