For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

06:42 AM Feb 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण
Advertisement

पोलिसांनी ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या : एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

किमान आधारभूत किमतीवर (एमएसपी) पिकांची खरेदी करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव नाकारल्यानंतर शेतकरी ‘दिल्ली चलो’ मोर्चा काढण्याच्या तयारीत असतानाच सीमेवर पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर वातावरण अधिकच भडकले.  तसेच अश्रुधुराच्या गोळ्यांना प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी मिरचीपूड टाकून आग लावल्यामुळे 12 पोलीस जखमी झाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी सांगितले. दरम्यानच्या काळात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यामुळे सरकारच्या प्रतिनिधीशी सुरू असलेले संभाषण अर्धवट राहिले आहे.

Advertisement

‘दिल्ली चलो’च्या पार्श्वभूमीवर सीमेवरील पोलिसांचा बंदोबस्त तोडण्यासाठी बुलडोझर, जेसीबीसारख्या अवजड यंत्रांसह शेतकरी सज्ज झाले आहेत. बुधवारी काही तऊण आंदोलक शेतकऱ्यांनी पंजाब आणि हरियाणामधील शंभू सीमेवर लावलेल्या बॅरिकेड्सकडे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. तसेच रबरी बुलेट्सद्वारे गोळीबारही झाल्याने 20 हून अधिक शेतकरी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. किसान युनियनचे नेते पंधेर आणि डल्लेवाल यांची प्रकृतीही बिघडली आहे. एकंदर या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. सद्यस्थितीत आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर पुढील दोन दिवस शेतकऱ्यांनी सीमेवरच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

शेतकरी आंदोलन सोडवण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने चंदीगडमध्ये केंद्र आणि शेतकरी यांच्यातील पाचव्या फेरीसाठी हालचाली सुरू झाल्या. याआधी चार फेऱ्यांच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. बुधवारी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच न करण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान सायंकाळी शंभू आणि खनौरी सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. आंदोलक शेतकरी अजूनही राष्ट्रीय राजधानीपासून 200 किलोमीटरहून अधिक दूर आहेत, परंतु दिल्ली पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स ओलांडू नयेत यासाठी पुरेपूर दक्षता घेतली आहे.

अश्रुधुराच्या गोळ्यांमुळे 23 वषीय तरुणाचा मृत्यू?

शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चादरम्यान अनेक प्रकारच्या बातम्या आणि अफवा पसरवल्या जात आहेत. 23 वषीय तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर येत असून हरियाणा पोलिसांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे. हरियाणा पोलिसांनी 3.30 वाजता ट्विट करत आतापर्यंत आपल्याला कोणाच्याही मृत्यूची माहिती नाही. पोलिसांनी ही अफवा असल्याचे म्हटले आहे. तर, खनौरी सीमेवर दोन पोलीस आणि एक आंदोलक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले. मात्र, शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी सरकार आमच्या विरोधात प्रचार करत 23 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या हल्ल्यात 12 पोलीस गंभीर

हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी दाता सिंग-खनौरी सीमेवर मिरची पावडर गवताच्या पेंडीत ओतली आणि पेटवून दिली. यासोबतच पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले. पोलिसांवर दगडफेकीसह लाठीहल्ला करण्यात आला. मिरचीपूड जाळल्याने निर्माण होणाऱ्या विषारी धुरामुळे पोलिसांसह आसपासचे लोक जखमी झाले. शेतकऱ्यांच्या हल्ल्यात सुमारे 12 पोलीस गंभीर जखमी झाले आहेत.

...अन् चर्चेला पुन्हा विराम!

दिल्ली पदयात्रेची तयारी सुरू असताना केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना चर्चेच्या पाचव्या फेरीचे निमंत्रण दिल्यानंतर एडीजीपी (इंटेलिजन्स) जसकरण सिंग ब्रार आणि नरेंद्र भार्गव यांनी त्यांची केंद्रीय नेत्यांशी बोलणी सुरू केली. शंभू सीमेवरील पोलिसांच्या कक्षातून बराच वेळ संभाषण झाले, मात्र याचदरम्यान खनौरी येथील शेतकऱ्यांवर हरियाणा पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबर गोळ्यांचा वापर केल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली. त्यात एका शेतकऱ्याचा जखमी झाल्याने मृत्यू झाला. यानंतर शेतकऱ्यांनी तातडीने केंद्राशी चर्चा थांबवली. ‘आपल्याला केंद्र सरकारकडून निमंत्रण आले होते, मात्र बैठकीदरम्यानच खनौरी सीमेवर त्यांच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. हा मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला हे आता आपण पाहू. त्यानंतरच पुढील चर्चा होणार की नाही हे ठरेल’, असे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी सांगितले.

ग्रेटर नोएडामध्येही ट्रॅक्टर मोर्चा

एकीकडे पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर आंदोलक शेतकरी उभे आहेत. ग्रेटर नोएडामधील शेतकऱ्यांनी बुधवारी ट्रॅक्टर रॅली काढून आपला पाठिंबा व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नोएडा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि पीएसी तैनात करण्याबरोबरच वाहतूक वळवण्यात आली. या ट्रॅक्टर रॅलीचे नेतृत्व बीकेयू (टिकैत) प्रदेशाध्यक्ष पवन खटाना म्हणाले की, जर सीमेवर शेतकऱ्यांना त्रास दिला जात असेल तर ते सर्व दिल्लीकडे कूच करतील. येथील शेतकरी आंदोलक फक्त राकेश टिकैत यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषीमंत्र्यांनी केले शांततेचे आवाहन

केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनी आंदोलक शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले असून चर्चेच्या पाचव्या फेरीचे निमंत्रण दिले आहे. सरकार पाचव्या फेरीत एमएसपीची मागणी, पीक विविधीकरण, खोडाचा मुद्दा, एफआयआर या सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. मी पुन्हा शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी आमंत्रित करतो. शांतता राखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, असे कृषीमंत्र्यांनी म्हटले आहे.

शेतकरी आंदोलनामुळे सीमेवर चक्काजाम

पंजाबमधील हजारो शेतकरी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत आहेत. शेतकऱ्यांचा हा ‘दिल्ली चलो’ मोर्चा सध्या देशाची राजधानी दिल्लीपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या शंभू सीमेवर थांबला असला तरी त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीकरांची डोकेदुखी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या ताज्या घोषणेनंतर दिल्ली पोलिसांनी शहराच्या सर्व सीमांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली मार्च’बाबतच्या सतर्कतेनंतर दिल्ली पोलिसांनी गाझीपूर सीमेवर नाकाबंदी केली आहे. पोलिसांनी गाझीपूर सीमेवरील उ•ाणपुलाखालून दिल्लीकडे येणारे सर्व मार्ग बंद केल्यामुळे गाझीपूर-युपी सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशमधून दिल्लीच्या दिशेने येणारे लोक वाहतूक कोंडीमुळे तासन्तास अडकून पडले होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी वाहतूक कोंडीच्या समस्येपासून लोकांना वाचवण्यासाठी ट्रॅफिक अॅडव्हायजरी जारी केली आहे.

Advertisement
Tags :

.