For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने

06:51 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसक निदर्शने
Advertisement

स्वत:वर पेट्रोल ओतून घेत आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न : पोलिसांशी संघर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे. शनिवारी अनेक जिह्यांमध्ये हिंसाचार झाल्यानंतर प्रशासनाने विष्णुपूर जिल्ह्यात कर्फ्यू लागू केला. तसेच अन्य पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी मैतेई संघटनेच्या अरामबाई टेंगगोल गटाच्या सदस्यांना अटक केल्यानंतर शनिवारी रात्री हिंसाचार उसळला. रविवारी सकाळीही परिस्थिती तणावपूर्ण राहिली. निदर्शकांनी रस्त्यांवर जाळपोळ करत वाहने पेटवली. तसेच गाड्यांची तोडफोड सुरू झाल्यानंतर हिंसक संघर्ष सुरू झाला. आंदोलकांनी स्वत:वर पेट्रोल ओतून प्रशासनाला आत्मदहनाची धमकी दिली. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये अनेक आंदोलक उभे राहून स्वत:वर पेट्रोल ओतून घेताना दिसत आहेत.

Advertisement

मणिपूरमधील मैतेई संघटनेचे नेते अरंबाई टेंगोले यांना रविवारी सीबीआयने अटक केली. त्यांच्यावर 2023 मध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची बातमी पसरल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मणिपूरमध्ये हिंसाचार उसळला. राजधानी इंफाळच्या अनेक भागात निदर्शकांनी वाहने जाळली, रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचरही जाळले. सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यात आली. याचदरम्यान आंदोलकांनी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच हिंसक झाले होते.

सरकारने 7 जूनच्या रात्री 11:45 वाजल्यापासून पाच दिवसांसाठी 5 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल डेटा सेवा बंद केल्या आहेत. यामध्ये इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, काकचिंग आणि विष्णुपूर यांचा समावेश आहे. इंफाळ पूर्व आणि विष्णुपूरमध्येही कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

कुकी-मैतेई समुदायातील संघर्ष 3 मे 2023 रोजी सुरू झाला असून तो अजूनही सुरू आहे. या दोन वर्षांत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 1,500 हून अधिक जखमी झाले आहेत. 70 हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्यातील या संघर्षादरम्यान 6 हजारांहून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

आत्मदहन करण्याचा प्रयत्न

मैतेई नेत्याच्या सुटकेची मागणी करत निदर्शकांनी इंफाळमधील क्वाकेथेल आणि उरीपोकमध्ये रस्त्याच्या मधोमध टायर आणि जुने फर्निचर जाळले. विमानतळालाही घेराव घालण्यात आला. इंफाळच्या वेगवेगळ्या भागात निदर्शक आणि पोलिसांमध्येही संघर्ष झाला. काही निदर्शकांनी स्वत:वर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील खुराई लामलोंगमध्येही संतप्त जमावाने एका बसला आग लावली. क्वाकेथेलमध्ये अनेक गोळीबाराचे आवाज ऐकू आले, परंतु गोळ्या कोणी चालवल्या हे कळू शकले नाही. येथे तीन जण जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.

राजभवनाची सुरक्षा वाढवली

राज्यात पुन्हा हिंसाचार उसळल्यानंतर राजभवनाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय दलांची अतिरिक्त तैनाती करण्यात आली आहे. प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. याचदरम्यान, रविवारी 25 आमदार आणि एका खासदाराचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चा केली. राज्यातील तणाव कमी करण्यासाठी  उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच या शिष्टमंडळाने नवीन सरकार स्थापन करण्याची मागणीही केल्याचे समजते.

नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली

मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट आहे, परंतु सध्याची विधानसभा विसर्जित केलेली नाही. ती फक्त स्थगित करण्यात आली आहे. तथापि, अलिकडेच 21 आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राज्यात त्वरित लोकप्रिय सरकार स्थापन करण्याची मागणी केली. 14 भाजप आमदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. यानंतर, एनडीएच्या 10 आमदारांनी 28 मे रोजी इंफाळमधील राजभवन येथे राज्यपाल अजय भल्ला यांची भेट घेतली होती. भाजप आमदारांच्या मागणीनुसार राज्यात 15 जूनपर्यंत सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :

.