Delhi Protest | दिल्लीत रणकंदन! जंतरमंतरवर आंदोलक-पोलिसांत तीव्र संघर्ष; इंटरनेट सेवा तूर्तास खंडित
दिल्ली -दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस चांगलाच वादळी ठरला. संसदेत NEET पेपरफुटीवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले, तर दुसरीकडे जंतरमंतरवर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या तीव्र संघर्षामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे.
कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती, मात्र पोलिसांनी त्यांना केवळ केरळ भवनापर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी दिली. यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाला. आंदोलकांनी संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा दलांनी आंदोलकांवर लाठीमार केला. या संघर्षाचे आणि पोलिसांच्या कारवाईचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून प्रशासनाने जंतरमंतर परिसरात आधीच वज्र वाहने आणि वॉटर कॅननसह मोठा फौजफाटा तैनात केला होता. लाठीमारानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे, तसेच मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आली आहे.
दरम्यान, एकीकडे रस्त्यावर हा संघर्ष सुरू असतानाच, दुसरीकडे सरकारने आंदोलकांशी मागच्या दाराने चर्चा सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरव दास यांना पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले असून, केंद्र सरकारचे प्रतिनिधी रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या चर्चेतून काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.