खानापुरात जागेच्या वादावरून दोन गटात तुंबळ हाणामारी
दोन गंभीर, 15 किरकोळ जखमी : दोन्ही गटातील दहा जणांची कारागृहात रवानगी
खानापूर : येथील सिरॅमिक कामगार आणि शाहूनगर वसाहतीतील रहिवाशांच्या जमिनीसाठी गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. सिरॅमिक कर्मचाऱ्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितल्यांनतर न्यायालयाने अन्य कोणीही या जागेत हस्तक्षेप करू नये, असा निर्वाळा देऊन सिरॅमिक कर्मचाऱ्यांनी आपल्या जागेचा उपभोग घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिल्याने गेल्या काही दिवसांपासून सिरॅमिक कर्मचारी आपल्या जागेची साफसफाई करून गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर भूमिपूजन करण्यात येत असताना शाहूनगर वसाहतीतील नागरिकांनी अचानक सिरॅमिक कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला. यात संदीप पाटील (वय 38), परशराम पाटील (वय 39) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव बिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तर अन्य 15 जण किरकोळ जखमी झाले.याप्रकरणी एका गटातील आठ जणांवर तर दुसऱ्या गटातील दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.यापूर्वीही कर्मचारी आणि शाहूनगरमधील रहिवाशांत वाद निर्माण झाला होता.
ऑगस्ट 2024 मध्ये प्रांताधिकारी श्रवण नाईक, तहसीलदार प्रकाश गायकवाड आणि बैलहोंगल विभागाचे डीवायएसपी रवी नाईक यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाची बैठक घेऊन प्रांताधिकारी श्रवण नाईक यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. सिरॅमिक कर्मचाऱ्यांनी याबाबत न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने शाहूनगर वसाहतीतील रहिवाशांनी कर्मचाऱ्यांच्या जागेत हस्तक्षेप करू नये आणि त्यांच्या मालकी हक्काला बाधा आणू नये, असा आदेश दिला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या जागेत साफसफाई करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्याचे नियोजन केले होते. रविवारी सकाळी पूजनासाठी सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी जमा होऊन जेसीबीद्वारे संरक्षण भिंतीचे पायाखोदाईचे काम सुरू केल्याबरोबर शाहूनगर वसाहतीतील नागरिकांनी काठ्या, लोखंडी रॉड, बॅट यासह इतर हत्यारे घेऊन अचानक हल्ला चढविला. यात संदीप पाटील (वय 38), परशराम पाटील (वय 39) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव येथील बिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
याबाबत प्रांताधिकारी श्रवण नाईक, डीवायएसफी रवि नाईक, खानापूर पोलीस स्थानकाचे निरीक्षक लालसाब गवंडी यांनी बैठक घेऊन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा केली. यानंतर खानापूर येथील येथील सिरॅमिक कर्मचारी आणि शाहूनगर वसाहतीतील नागरिकांच्या झालेल्या हाणामारीत दोन्ही गटातील इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात प्रसाद सोनटक्के, धनुष सोनटक्के, राघव सोनटक्के, विजय लाखे, गजानन सोनटक्के, राजा कुडाळे, सुशील कुडाळे, दिलीप सोनटक्के तर सिरॅमिक कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यातील गणेश शिवठणकर आणि हनुमंत कुरूनकर यांना अटक करून न्यायालयासमोर रात्री उशिरा हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली असल्याचे खानापूर पोलिसांनी सांगितले आहे.
आम्ही कुणाकडे न्याय मागावा!
सिरॅमिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यल्लारी गावडे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले की, आमच्या वाडवडिलांनी त्याकाळी अगदी कवडीमोल पगारावर नोकरी करून आपला उदरनिर्वाह चालवला आणि कारखाना मालकांना मोठ्या प्रमाणात उत्पादन करून दिले, मात्र कारखाना मालकाने कर्मचाऱ्यांना पीएफ न देता आम्हाला हा भूखंड दिलेला आहे. तसेच शाहू वसाहतीला एक एकर 38 गुंठे जागा देण्यात आली आहे. आम्ही त्यांच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण केलेले नसताना हा भूखंड आम्ही कायदेशीर मार्गाने ताब्यात घेत असताना आम्हाला पोलीस तसेच नागरी प्रशासनाकडून न्याय देण्यात येत नाही. न्यायालयाने आम्हाला या जागेचा उपभोग घेताना कोणीही अडसर करू नये, असा आदेश दिला असताना देखील आमच्यावर लाठ्या-काठ्यानी हल्ला करण्यात आला आहे. आम्ही कुणाकडे न्याय मागावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.