शिंगणापूरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी
शिखरशिंगणापूर :
यात्रेत कावडधारक भाविकांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने दोन भाविक जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर, माळशिरस व नातेपुते अशा तीन कावडी पायरी मार्गाने मंदिराकडे जात होत्या. आपल्या गावची कावड पुढे नेण्याच्या कारणावरून तिन्ही कावडीच्या गटातील भाविकांमध्ये चुरस निर्माण झाली. कावड पुढे नेण्याच्या कारणावरून शिंगणापूर येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यात दोघे जखमी झाले. पोलिसात नोंद झाल्याची माहिती मिळाली नाही.
कावडी सोबतच्या गटातील भाविकांनी एकमेकांना धक्काबुक्की करत स्थानिक व्यावसायिकांच्या दुकानातील नारळ उचलून फेकून मारले. यावेळी काही भाविक जखमी झाले तर काहींनी तेथून पळ काढला. त्यांनतर मंदिर परिसरात गेल्यानंतरही कावडी नाचवत असताना दोन्ही गटात पुन्हा हाणामारी झाली. यामध्ये शरद सुरेश गुरव (वय 40, रा. माळशिरस) व सिद्धू प्रकाश आळगे (वय 24, रा. इंदापूर) हे दोघेजण जखमी झाले. त्यांच्यावर शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
तसेच दुसऱ्या एका घटनेत अमृतेश्वर मंदिरानजीक पटवर्धन कुरोली व वाघोली या कावडीधारक भाविकांच्या दोन गटात कावडी नाचवण्याच्या कारणावरून मारामारी झाली. यामध्येही एक भाविक जखमी झाल्याचे समजते. दरम्यान कवडीसोबत येणारे काही हुल्लडबाज युवक मद्यपान करून येत असतात. त्यातून कावडी पुढे नेणे, नाचवणे या कारणामुळे दंगामस्ती, मारमारीचे प्रकार घडत असल्याने यात्रा उत्सवाला गालबोट लागत आहे. त्यामुळे दहिवडी, माळशिरस तसेच इंदापूर प्रशासन यंत्रणेने याची गंभीर दखल घेऊन हुल्लडबाजी, मारामारी करणाऱ्या कावडीवर कारवाई करण्याची मागणी भाविक वर्गातून होत आहे.