For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यार्थिनीच्या खुनानंतर हुबळीत तीव्र आंदोलन

06:23 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्यार्थिनीच्या खुनानंतर हुबळीत तीव्र आंदोलन
Advertisement

अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने : आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

प्रेमाचा प्रस्ताव धुडकावल्याने महाविद्यालयीन युवतीची त्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या युवकाने निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी हुबळीतील बीव्हीबी महाविद्यालयात घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसह अनेक संघटनांनी हुबळीत तीव्र आंदोलन छेडले. खून करणारा आरोपी फैयाजला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.

Advertisement

25 वर्षीय नेहा हिरेमठ ही हुबळीच्या बीव्हीबी महाविद्यालयात एमसीएच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तर याच महाविद्यालयात शिकणाऱ्या सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथील 27 वर्षीय फैयाजने एकतर्फी प्रेमातून नेहा हिरेमठचा महाविद्यालय आवारातच चाकूने भोसकून खून केला. नेहा ही काँग्रेसच्या नगरसेवकाची मुलगी आहे. तर संशयित फैयाज हा शिक्षकाचा मुलगा आहे. फैयाज हा गेल्या काही महिन्यांपासून नेहाला प्रेमासाठी सतावत होता. मात्र, नेहाने हा प्रस्ताव धुडकावला होता. त्यामुळेच त्याने नेहाचा भरदिवसा खून केल्याचे उघडकीस आले आहे. फैयाजला हुबळीच्या विद्यानगर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीला फाशी देण्याची मागणी

नेहाच्या खून प्रकरणानंतर अनेक संघटना संतप्त झाल्या असून शुक्रवारी सकाळी हुबळीसह अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्यात आले. अभाविपच्या नेतृत्त्वाखाली हजारो विद्यार्थ्यांनी विद्यानगर येथील बीव्हीबी कॉलेजसमोर तीव्र आंदोलन केले. फैयाजच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हुबळी-धारवाड मुख्य मार्गावर ठिय्या आंदोलनही केले. भित्तीपत्रके प्रदर्शित करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली. तेथे आलेल्या पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांना विद्यार्थ्यांनी घेराव घालून न्याय देण्याची मागणी केली. त्यावेळी पोलीस आयुक्तांनी आरोपीला अटक केली आहे. कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल. सर्वांनी शांतता पाळावी, अशी विनंती केली.

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर टायर पेटवून घटनेचा निषेध नोंदविला. हिंदू जागरण मंचच्या सदस्यांनीही आंदोलन केले. आरोपी फैयाज याला फासावर चढवावे, अशी मागणी केली. कर्नाटक दलित विमोचना समितीच्या सदस्यांनी हुबळीच्या चन्नम्मा सर्कलपासून बीव्हीबी कॉलेजपर्यंत मोर्चा काढला. कॉलेजबाहेर डीसीपी राजीव एम. आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लव्ह जिहादचा वेगाने फैलाव : निरंजन हिरेमठ

लव्ह जिहादचा वेगाने फैलाव होत आहे. महाविद्यालयांत जाणाऱ्या मुलींची काळजी घ्यावी, असे आवाहन नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी मुलींच्या माता-पित्यांना केली आहे. कोणत्याही मुलींनी अशा घटनांना बळी पडू नये. आमच्यावर जी परिस्थिती ओढवली, ती इतरांवर येऊ नये, अशी भावनाही निरंजन हिरेमठ यांनी व्यक्त केली.

भाजपकडून सरकारवर परखड टीका

नेहा हिरेमठच्या खुनाच्या घटनेनंतर भाजप नेत्यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली आहे. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वैयक्तिक कारणातून ही घटना घडल्याचे म्हटले आहे. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी खुनाची घटना प्रेमप्रकरणातून झाली असल्याचे सांगितले. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेविषयी निरंजन हिरेमठ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अभाविपकडून आज राज्यभरात आंदोलन

महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या खुनाच्या निषेधार्थ शनिवार 20 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अभाविपच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अभाविपच्या कर्नाटक उत्तर प्रांताचे राज्य सचिव सचिन कुळगेरी यांनी दिली. सकाळी 10 वाजता सर्व जिल्हा केंद्रांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांसमवेत निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी एन्काऊंटर कायचा जारी करावा. नेहाचा खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी, अशी मागणी सचिन कुळगेरी यांनी शुक्रवारी हुबळीत पत्रकार परिषदेत केली.

Advertisement
Tags :

.