बांगला देशात हिंसाचार होणे शक्य
अमेरिकेची नागरीकांना प्रवास टाळण्याची सूचना
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
बांगला देशात 12 फेब्रुवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणूक काळात त्या देशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि रक्तपात होण्याची शक्यता आहे, असा इशारा अमेरिकेकडून देण्यात आला आहे. परिणामी, अमेरिकन नागरीकांनी बांगला देशचा प्रवास टाळावा, अशी सूचना अमेरिकेच्या प्रशासनाने आपल्या नागरीकांना केली आहे. बांगला देशातील वातावरण सध्या तापलेले आहे.
बांगला देशच्या अंतरिम प्रशासनाने तेथे निवडणूक घोषित केली आहे. तथापि, या देशाची स्थिती आणि कोसळलेली कायदा आणि सुव्यवस्था पाहता, निवडणूक शांततेत पार पडेल याची कोणतीही शाश्वती नाही. गेल्या एक महिन्यात तेथे अनेक हिंदूंच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. निवडणूक जवळ आली असून हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तेथील शेख हसीना सरकारचे पतन झाल्यानंतर त्या देशात इस्लामी कट्टरवाद्यांचा प्रभाव वाढला आहे. जमाते इस्लामी हा पक्ष या निवडणुकीत भाग घेत आहे. त्याची स्पर्धा बांगला देश नॅशनल पार्टी या तुलनेने सौम्य पक्षाशी होत आहे. अशावेळी तेथील कट्टरवाद्यांकडून अधिक प्रमाणात हिंसाचार होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय तज्ञांकडूनही व्यक्त होत आहे.
हिंदूंची अवस्था कठीण
बांगला देशात हिंदूंची अवस्था कठीण झाल्याचे दिसत आहे. त्या देशात हिंदूंची लोकसंख्या 8 ते 10 टक्के आहे. तथापि, त्यांचा राजकारणावर विशेष प्रभाव नाही. त्यांचा कोणताही मोठा राजकीय पक्ष नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांकडून त्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता अधिक आहे. शेख हसीना सरकारचे पतन झाल्यापासून त्या देशात अराजकसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे धर्मांध संघटनांच्या उच्छादाला ऊत आला आहे. निवडणूक शांततेने पार पाडली जाईल, असे आश्वासन त्या देशाच्या प्रशासनाने दिले असले तरी त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही. म्हणून अमेरिकेने आपल्या नागरीकांना प्रवास टाळण्याची सूचना दिली आहे.