मशीद सर्वेक्षणादरम्यान उत्तर प्रदेशात हिंसाचार
जमावाने दहाहून अधिक वाहने पेटवली, जाळपोळ-दगडफेकीनंतर इंटरनेटही बंद
वृत्तसंस्था/ संभल (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशमधील संभल येथे रविवारी सकाळी जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार निर्माण झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार मुघलकालीन जामा मशिदीचे सर्वेक्षण केले जात असताना स्थानिक लोक आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक झाली. या संघर्षात तीन लोकांचा मृत्यू झाला. तसेच जमावाकडून झालेल्या दगडफेकीत 30 हून अधिक पोलीस जखमी झाले. ही मशीद एका वादग्रस्त कायदेशीर लढाईच्या केंद्रस्थानी असून ती हिंदू मंदिराच्या जागेवर बांधल्याचा दावा केला जातो.
‘अॅडव्होकेट कमिशनर’च्या नेतृत्वाखालील प्रशासकीय यंत्रणेने रविवारपासून सर्वेक्षणाचे काम सुरू केले होते. याचदरम्यान मशिदीजवळ जमाव जमल्यानंतर हिंसाचार सुरू झाला. सुमारे एक हजार लोक जमावात सामील झाले होते. त्यांनी पोलिसांना मशिदीत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. जमावातील काही लोकांनी घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. तसेच जमावाने दहाहून अधिक वाहने पेटवून दिली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यानंतर गोंधळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हिंसाचारप्रकरणी 3 महिलांसह सुमारे 15 जणांना अटक केल्याचे मुरादाबादचे आयुक्त अंजनेय सिंह यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारची हिंसक चकमक होऊ नये म्हणून संभलमध्ये आधीच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. तसेच आता डीजीपींना गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या घटनेवर पोलीस अधीक्षकांनी जमावातील सर्व लोकांवर एनएसए लावला जाईल, असा इशारा दिला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांची ओळख पटवली जाणार आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी जखमी
जामा-मशीदमध्ये सर्वेक्षणादरम्यान झालेल्या गोळीबारात सीओ अनुज चौधरी यांच्या पायाला गोळी लागली. तसेच दगडफेकीत पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीही जखमी झाले. याव्यतिरिक्त गोळीबार-दगडफेकीत 30 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. संभल येथील शाही जामा मशिदीत झालेल्या गदारोळात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. अनेक पोलीसही जखमी झाले आहेत.