वक्फ कायद्यावर मुर्शिदाबादमध्ये हिंसा
वृत्तसंस्था / मुर्शिदाबाद
केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात होत असलेल्या आंदोलनामुळे हिंसाचार झाला आहे. दंगलखोरांनी अनेक वाहनांना आगी लावल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना प्रयत्न करावे लागत आहेत.
मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या जांगीपूर येथे मोठा जमाव नव्या वक्फ कायद्याच्या निषेध करण्यासाठी जमला होता. या जमावाने दंगल करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी दंगेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी जमावातील लोकांना घरी जाण्यास सांगितले. यावर संतप्त होऊन जमावाने पोलिसांवरच हल्ला केला, असे वृत्त आहे. जमावातील लोकांनी रस्त्यांच्या बाजूला थांबविण्यात आलेल्या गाड्यांना आणि वाहनांना आगी लावल्या. किमान 50 वाहने जळून खाक झाली असावीत असे अनुमान आहे. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दंगलखोरांवर लाठीहल्ला केला तसेच अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. तथापि, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मालमत्ता आणि खासगी वाहने यांची हानी झाली होती.
भाजपची टीका
पश्चिम बंगालमध्ये प्रशासनच दंगलखोरांना साहाय्य करीत आहे. आणखी वर्षभरात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रशासन जाणूनबूजून वक्फ कायद्याचे प्रकरण तापविण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंसाचार झाल्यास आपल्याला राजकीय वातावरण अनुकूल होईल, अशी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची समजूत आहे. त्यामुळे लोकांना शांतता हवी असतानाही प्रशासन परिस्थिती बिघडवित आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने या हिंसाचारासंबंधी केला आहे. तृणमूल काँग्रेसने राज्यातील वातावरण बिघडविण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालविला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी केला. त्यांनी पक्षाच्या वेबसाईटवर या हिंसाचाराचे चित्रण प्रसारित केले आहे