ग्रीसमध्ये हिंसाचार; संसदेबाहेर बॉम्बफेक
वृत्तसंस्था/ अथेन्स
ग्रीसमधील दोन शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिंसाचार उसळला आहे. हिंसाचाराच्या वेळी राजधानी अथेन्समधील संसदेबाहेर बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी हिंसक निदर्शकांवर अश्रुधुराचा आणि स्टन ग्रेनेडचा मारा केला आणि पाण्याच्या तोफांचा वापर केला. दरम्यान, निदर्शकांनी सुरक्षा दलांवर पेट्रोलबॉम्ब फेकले. हिंसाचार प्रकरणी 61 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ग्रीक पोलिसांनी शनिवारी दिली. ग्रीक संसदेत शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. तथापि, विरोधी पक्षाचा प्रस्ताव अयशस्वी झाल्यानंतर अपघाताची राजकीय जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत देशभर निदर्शने सुरू झाली. 28 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रीसच्या टेम्पे शहरात झालेल्या रेल्वे अपघातात 57 जणांचा मृत्यू झाला होता. रेल्वे सुरक्षा व्यवस्थेच्या अपयशाची जबाबदारी घेण्यात सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.