बांगलादेशी घुसखोरांकडूनच हिंसाचार
पश्चिम बंगालमधील दंगलींच्या चौकशीचा निष्कर्ष
वृत्तसंस्था / कोलकाता
केंद्र सरकारच्या वक्फ कायद्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या दंगली आणि हिंसाचारात बांगला देशमधून आलेल्या घुसखोरांचा प्रमुख सहभाग आहे, असा निष्कर्ष आतापर्यंतच्या तपासकार्यातून निघाला आहे. केंद्र सरकारच्या गृहविभागाचे या राज्यातील स्थितीवर बारकाईने लक्ष असून योग्य वेळी योग्य कृती केली जाईल, असे प्रतिपादन गृहविभागाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने पेले आहे.
पश्चिम बंगालसंबंधी केंद्रीय गृहविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची एकमेकांमध्ये चर्चा झाली असून गृहविभाग घडणाऱ्या घडामोडींसंबंधी चिंतीत आहे. हिंसाचार आणि जाळपोळ तातडीने थांबण्याची आवश्यकता आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात केंद्रीय अर्धसैनिक दलांच्या अतिरिक्त तुकड्या नियुक्त करण्यात आल्या आहेत.
बांगलादेशी घुसखोर आघाडीवर
राज्यामध्ये दंगली घडविण्यात बांगलादेशी घुसखोर आघाडीवर आहेत. त्यांना तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळत आहे. प्रथम बांगलादेशी घुसखोरांवर या स्थानिक तृणमूल नेत्यांचे नियंत्रण होते. तथापि, नंतर ते नियंत्रण सुटले आणि बांगलादेशी घुसखोर मोकाट सुटले आहेत, अशीही विश्वसनीय माहिती केंद्र ाrय गृहविभागाकडे आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
बॅनर्जी यांनी स्पष्टीकरण द्यावे...
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती ढासळली असल्याचे दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेले आहे. जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथे त्यांना घरे सोडून जाण्यासाठी धमक्या येत आहेत. त्यामुळे हजारो हिंदूंनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातून पलायन केले असून माल्दा येथे आश्रय घेतला आहे. या सर्व स्थितीचे स्पष्टीकरण राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे मागण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दंगलखोरांनी रेल्वेच्या मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात खासगी मालमत्ता नष्ट करण्यात आली आहे.
घोटाळ्यावरुन लक्ष हटविण्यासाठी...
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 26 हजार प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द ठरविल्या आहेत. हा शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा असून तो राज्य सरकारवर शेकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घोटाळ्यावरुन लोकांचे लक्ष हटविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारने ही दंगल घडवून आणली आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या दंगलींमुळे पश्चिम बंगालमधील हिंदू किती भीतीच्या वातावरणात रहात आहेत, हे सिद्ध होते. राज्यातील हिंदूंना संरक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून संपर्क
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पश्चिम बंगाल सरकारचे मुख्य सचिव आणि डीजीपी यांच्याशी संपर्क करुन त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. त्वरित स्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना राज्य प्रशासनाला दिल्या गेल्या अशी माहिती देण्यात आली.
तीन जिल्ह्यांमधील स्थिती शांत
मुर्शिदाबाद, माल्दा आणि दक्षिण 24 परगाणा या तीन दंगलग्रस्त जिल्ह्यांमधील परिस्थिती आता तुलनेने शांत आहे, असे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे. या दंगलींमध्ये आतापर्यंत एकंदर तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच, असंख्य वाहने आणि घरे जाळली गेली असून अनेक हिंदूंनी पलायन केले आहे.