For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

फ्रान्समध्ये हिंसाचार अन् लूटमार, संवेदनशील भागांत संचारबंदी

07:59 AM Oct 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्समध्ये हिंसाचार अन् लूटमार  संवेदनशील भागांत संचारबंदी
Advertisement

गृहमंत्री न्युनेझ यांनी दाखविली राजीनाम्याची तयारी : अध्यक्ष मॅक्रॉन यांनी स्वीकारण्यास दिला नकार

Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

फ्रान्समधील पॅरिस, लियोन आणि मार्सेईसह अनेक शहरांमध्ये हिंसाचार, जाळपोळ आणि दुकानांमध्ये लूटमार झाल्याच्या घटनांमुळे प्रशासनासमोरील आव्हाने वाढली आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान सेबास्टियन लेकॉर्नू यांनी हिंसाचाराचा धोका असलेल्या संवेदनशील भागांमध्ये आवश्यकतेनुसार मर्यादित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री लॉराँ न्युनेज यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली, मात्र अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला.

अनेक शहरांमध्ये जाळपोळ

पॅरिस, लियोन आणि मार्सेईसह विविध शहरांमध्ये रविवारी संध्याकाळी कचरापेट्या, सायकल्स आणि इतर वस्तूंना आग लावण्यात आली. अनेक दुकानांमध्येही लूटमारही झाली. यापूर्वी शनिवारी महागाई आणि शाळांच्या खराब स्थितीविरोधात झालेल्या देशव्यापी आंदोलनांदरम्यान हिंसाचार उफाळून आला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार देशभरात किमान 2,400 जणांना अटक करण्यात आली आहे.

राजीनामा नाकारला

हिंसाचार रोखण्यात आणि परिस्थितीचा पूर्वअंदाज घेण्यात प्रशासनाकडून त्रुटी राहिल्याची चर्चा सुरू असताना गृहमंत्री लॉराँ न्युनेझ यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. मात्र सध्याच्या परिस्थितीत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचे पदावर कायम राहणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. हिंसाचारापूर्वीची तयारी, गुप्तचर माहितीचे संकलन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीतील त्रुटींची चौकशी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सरकारी इमारती, ऐतिहासिक वास्तू लक्ष्य

हिंसक जमावाने काही शहरांमध्ये ऐतिहासिक वास्तू आणि सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले आहे. मध्य फ्रान्समधील लिमोज शहरात 19 व्या शतकातील ऐतिहासिक सिटी हॉल इमारतीला आग लावण्यात आली. या आगीत इमारतीच्या छताचे नुकसान झाले असून ऐतिहासिक वास्तूला मोठा फटका बसला आहे.

मार्सेईमध्ये जमावबंदी

हिंसाचाराला आळा घालण्यासाठी मार्सेई प्रशासनाने निदर्शने आणि लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. संवेदनशील भागांमध्ये मर्यादित संचारबंदी, पोलिसांच्या रणनीतित बदल आणि सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यावर सरकारने भर दिला आहे.

रणनीति बदल करण्याची गरज

गृहमंत्री न्युनेझ यांनी हिंसाचारसाठी लुटारू आणि कट्टरपंथी कार्यकर्त्यांना जबाबदार ठरविले. वेगवेगळ्या ठिकाणी झपाट्याने हालचाल करणाऱ्या जमावांना रोखण्यासाठी पोलिसांची कार्यपद्धती बदलण्याची गरज असल्याचेही त्यांनी मान्य केले. गंभीर हिंसाचार आणि मोठ्या प्रमाणावरील मालमत्तेचे नुकसान होऊनही कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे पंतप्रधान लेकॉन यांनी नमूद केले. फ्रान्समधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात येत असून हिंसाचाराची पुनरावृत्ती टाळणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे हे प्रशासनासमोरील प्रमुख आव्हान ठरले आहे.

Advertisement
Tags :

.