For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सामान्यांवरील अरेरावी पोलीस खात्याला शोभणारी नाही

12:27 PM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
सामान्यांवरील अरेरावी पोलीस खात्याला शोभणारी नाही
Advertisement

राज्य पोलीस महासंचालकांची टिप्पणी : आदर्श वर्तनासाठी अठरा सूचनांचे पालन करण्याचे आदेश

Advertisement

बेळगाव : अधिकारी व पोलिसांनी कामानिमित्त आपल्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशी सूचना राज्य पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम यांनी राज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे. यासंबंधी 21 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीसप्रमुखांना त्यांनी पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या अरेरावीला व मनमानीला चाप बसणार आहे. अरेरावी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही राज्य पोलीस महासंचालकांनी दिला आहे. डॉ. एम. ए. सलीम यांनी पोलीस महासंचालकपदाची धुरा सांभाळल्यानंतर पोलीस दलात अनेक सुधारणा करण्यासाठी धडपड सुरू केली आहे. काही जिल्ह्यात अधिकारी व पोलिसांच्या अरेरावीला सर्वसामान्य नागरिक कंटाळले आहेत. त्यामुळे पोलीस दलावरचा विश्वास उडत चालला असतानाच राज्य पोलीस महासंचालकांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला सौजन्याने व निष्ठेने वागण्याचा सल्ला दिला आहे.

कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करताना समाजाशी उत्तम संबंध ठेवणे गरजेचे आहे. आपली सत्ता गाजवताना सौजन्याने व आदराने वागावे. त्यांच्या वागणुकीत ते ठळकपणे उठून दिसावे. सकारात्मक दृष्टिकोन व व्यावसायिक वागणूक यामुळे पोलीस दलाबद्दलचा विश्वास वाढणार आहे. याचा उपयोग गुन्हेगारी थोपवण्यासाठीही होणार आहे. अधिकाराचा दुरुपयोग करीत अनावश्यकपणे नागरिकांवर बलप्रयोग करणे किंवा त्यांच्याशी हुज्जत घालत अरेरावीने वागणे पोलीस खात्याला शोभणारे नाही.

Advertisement

प्रत्येक नागरिकाच्या हक्कांचा आदर करत त्यांच्याशी संयमाने वागावे. त्यामुळे पोलीस दलाबद्दलचा आदर वाढणार आहे. नागरिकांबरोबरच्या सर्व व्यवहारात व्यावसायिकता, प्रामाणिकपणा व पारदर्शकता राखावी. गणवेशात असताना किंवा साध्या वेशात असताना अधिकारी व पोलीस कसे वागतो, यावर पोलीस दलावरचा आदर व विश्वास ठरणार आहे. अधिकाऱ्यांना याचा विसर पडू नये, असे सांगतानाच राज्य पोलीस महासंचालकांनी अठरा सूचना केल्या आहेत. नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास हीच आपली मौल्यवान मालमत्ता आहे, हे प्रत्येक अधिकाऱ्याने ध्यानात ठेवावे. या सूचनांचे उल्लंघन करण्याचा प्रकार गांभीर्याने घेतला जाणार आहे. पोलीस दलाच्या नियमानुसार संबंधितांबरोबर व्यवहार केला जाणार आहे. या सूचना प्रत्येक वरिष्ठांनी आपल्या अखत्यारीतील अधिकारी व पोलिसांना सांगून त्यांचे पालन करण्याची खात्री करून घेण्याची सूचनाही डॉ. एम. ए. सलीम यांनी केली आहे.

पोलीस महासंचालकांच्या महत्त्वाच्या सूचना

  • पोलीस दलाच्या सर्व अधिकृत व्यवहार व कार्यपद्धतीत पूर्णपणे पारदर्शकता असावी. पोलीस दलाला भेट देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी लक्षात न घेता सर्वांकडे समानपणे पाहावे.
  • नागरिकांच्या समस्या संयमाने ऐकून कायद्यानुसार त्वरित गुन्हे दाखल करून घ्यावेत. अनावश्यकपणे विलंब करू नये.
  • नागरिकांशी संभाषण करताना उर्मट भाषा किंवा वर्तन न दाखवता सौजन्याने वागावे व कायद्याची अंमलबजावणी करावी.
  • कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थांकडून कोणत्याही प्रकारची मागणी करू नये. बेकायदा मदत किंवा त्यांच्याकडून नफा स्वीकारण्यापासून पूर्णपणे दूर राहावे.
  • कर्तव्यावर असताना व त्यानंतरही नैतिकपणे इतरांनाही आदर्श ठरावा, असे राहावे. पोलीस दलाच्या नियमांचे पालन करावे.
  • स्टेशन डायरी व केस फाईलमध्ये व्यवस्थित माहिती असावी.
  • तपासकामात पारदर्शकता असावी. प्रत्येक टप्प्यावर जबाबदारीने काम करावे. कोणत्याही नागरिकांना अनावश्यकपणे त्रास देऊ नये.
  • महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांच्याशी विशेष काळजीने व संवेदनशीलपणे वागावे.
  • नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारींविषयी त्यांना वेळोवेळी माहिती द्यावी. कर्तव्यावर असताना किंवा अधिकृत कामकाज हाताळताना शिस्तीने वेळेचे पालन करावे.
  • पोलीस व नागरिक यांच्यातील संवादाच्यावेळी गणवेशात असताना बॉडीवोर्न कॅमेरे व इतर तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करावा.
  • सर्व अधिकृत विषयांमध्ये न्यायव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य देऊन अटक व चौकशीच्या वेळी नागरिकांच्या  खासगीपणाचा आदर करावा. अधिकाराचा दुरुपयोग, दौर्जन्यापासून दूर राहावे. सद्वर्तनामुळे आदर्श ठरावे.
  • समाजात सक्रियपणे भाग घ्यावा. सार्वजनिक जागृती कार्यक्रमांचे आयोजन करून पारदर्शक,कायदेशीर व सहानुभूतीपूर्वक व्यवहाराने नागरिकांचा विश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
  • पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रभाव टाकणाऱ्या किंवा त्यांना भ्रष्ट बनवणारे कोणतेही प्रयत्न दिसून आल्यास याविषयी वरिष्ठांना माहिती द्यावी.
  • अन्य पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून तक्रारी आल्यास त्यांना त्या पोलीस ठाण्याला जा,असे न सांगता आपल्याच पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करून नंतर कार्यक्षेत्राच्या आधारावर ते संबंधित पोलीस ठाण्याला वर्ग करावे.
  • सायंकाळी सहानंतर चौकशीसाठी किंवा जबानी घेण्यासाठी महिलांना पोलीस स्थानकात बोलावू नये.
  • जर एखादी महिला आरोपी असल्यास किंवा पीडिता असल्यास महिला पोलिसांच्या मदतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी करावी.
  • फौजदारी प्रकरणात महिलांचा सहभाग आढळून आल्यास त्यांना अटक करून त्यांची चौकशी करताना त्यांचा अपमान होऊ नये, याची काळजी घ्यावी. त्यांना पोलीस ठाण्यात न ठेवता स्टेट होममध्ये ठेवावे.
  • उत्तम गणवेश किंवा साध्या वेशातही चांगले कपडे परिधान करणारा अधिकारी नागरिकांच्या आदरास पात्र ठरतो. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तम गणवेश परिधान करावे. त्यामुळे परिणामकारकपणे सेवा बजावता येते.
Advertisement
Tags :

.