शांतता बैठकीनंतर पुन्हा मणिपूरमध्ये हिंसाचार
जिरीबाममध्ये गोळीबार-बॉम्बफेक : सीआरपीएफ-पोलीस घटनास्थळी तैनात : लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील तणाव निवळावा यासाठी अलिकडेच दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर पुन्हा एकदा जिरीबाम जिल्ह्यात हिंसाचार उसळला आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता बोरोबेकरा भागातील एका गावात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. तसेच बॉम्बफेकही केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सीआरपीएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार सुरू झाला.
सावधगिरीची उपाययोजना म्हणून हल्ला झालेल्या भागात वास्तव्य करणाऱ्या वृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले आहे. बोरोबेकरा हे जिरीबाम शहरापासून 30 किमी अंतरावर आहे. या परिसरात घनदाट जंगल आणि डोंगर असून यापूर्वीही येथे गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी शुक्रवारी जिरीबाममधील कालीनगर हमर वेंग भागातील एका शाळेला दहशतवाद्यांनी आग लावली होती.
शांततेचे प्रयत्न निष्फळ
4 दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये शांततेसाठी दिल्लीत बैठक झाली होती. 15 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निमंत्रणावर मैतेई, कुकी आणि नागा समुदायातील 20 आमदार दिल्लीत पोहोचले होते. प्रत्येकाने आपल्या मागण्या केंद्रापुढे मांडल्या. त्यानंतर त्यांना मणिपूरमध्ये यापुढे हिंसाचार न करण्याची शपथ देण्यात आली. याला तिन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शवली. यानंतर प्रतिनिधींनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. सुमारे दीड तास ही बैठक चालल्यानंतर सभेच्या 4 दिवसानंतर शनिवारी जिरीबाममध्ये हिंसाचार झाला. केंद्र सरकारकडून सुरू असलेले शांततेचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याने हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे.
मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी
मणिपूरमधील भाजपच्या 19 आमदारांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना हटवण्याची मागणी केली. आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हिंसाचार थांबवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. केवळ सुरक्षा दलांच्या तैनातीने काहीही होणार नाही. हिंसाचार दीर्घकाळ सुरू राहिल्यास एक राष्ट्र म्हणून भारताची प्रतिमाही डागाळली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या बैठकीला कुकी, मैतेई आणि नागा आमदारही उपस्थित होते. पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये विधानसभा अध्यक्ष थोकचोम सत्यवर्त सिंग, मंत्री थोंगम विश्वजित सिंग आणि युमनम खेमचंद सिंग यांचा समावेश आहे.