For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींविरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव

06:33 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींविरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव
Advertisement

संसदेत ‘जात’ प्रकरणावरून गदारोळ सुरुच, भाजपकडून ठाकूर यांचे समर्थन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या ‘जात’ विधानाचे पडसाद बुधवारीही उमटल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या माध्यमावरून अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे समर्थन केले असून हा विशेषाधिकाराचा भंग असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भारतीय जनता पक्षाने ठाकूर यांच्या विधानांचे समर्थन केले आहे.

Advertisement

मंगळवारी संसदेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांच्या जोरदार शाब्दिक हल्ला चढविला होता. राहुल गांधी यांनी विषय समजून न घेताच अद्वातद्वा आरोप केले आहेत. त्यांनी चक्रव्यूह आणि पद्मव्यूह आदी शब्द उच्चारुन महाभारताचा उल्लेख केला, जो अत्यंत चुकीचा होता. राहुल गांधी यांचे पिता राजीव गांधी यांच्या राजीव या नावाचा अर्थही पद्म किंवा कमळ असाच होतो. त्यामुळे त्यांनीही देशाला चक्रव्यूहात अडकविले होते, असे राहुल गांधी यांना सुचवायचे आहे का, अशी पृच्छा ठाकूर यांनी केली होती. गांधी नेहमी जातीजनगणनेचा मुद्दा उपस्थित करतात. पण त्यांच्या स्वत:च्या जातीची माहिती कोणालाही नाही. तरीही ते या मुद्द्यावरुन गोंधळ घालून आपण मागासवर्गीय आणि दलितांचे तारणहार असल्याचा आव आणतात, अशी टीका आपल्या भाषणात अनुराग ठाकूर यांनी केली होती.

संसदेबाहेरही गदारोळ

ठाकूर यांच्या विधानाचे पडसाद संसदेबाहेरही उमटले आहेत. काँग्रेसने भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या माध्यमावर एक पोस्ट प्रसिद्ध करून ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केले होते. ठाकूर यांनी काँग्रेसचा खोटारडेपणा उघड केला. त्यांचे भाषण प्रत्येकाने ऐकण्यासारखे आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

चन्नी यांच्याकडून नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसचे खासदार चरणजीतसिंग चन्नी यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस देत असल्याचे स्पष्ट केले. ठाकूर यांच्या भाषणातील जो भाग लोकसभा अध्यक्षांनी काढून टाकला होता, त्या भागासकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण आपल्या पोस्टच्या द्वारे प्रसिद्ध केले आहे. हा संसदेच्या नियमांचा भंग आहे, असे प्रतिपादन चन्नी यांनी केले.

भाग वगळला की नाही...

अनुराग ठाकूर यांच्या भाषणातील काही भाग लोकसभा अध्यक्षांच्या आदेशावरुन वगळण्यात आला आहे का, असा प्रश्न आता निर्माण` झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या म्हणण्यानुसार भाग वगळण्याचा कोणताही आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेला नाही. त्यामुळे हे भाषण सर्वांसाठी जसेच्या तसे उपलब्ध आहे. तथापि, काँग्रेसच्या म्हणण्यानुसार काही भाग वगळण्याचा आदेश त्यांनी दिला होता. आता या मुद्द्यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद होत आहे.

खर्गे यांची टीका

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही भारतीय जनता पक्षावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकूर यांच्या भाषणासंबंधी पोस्ट केली ही चूक आहे. संसदेत जातीसंबंधी उल्लेख करणेही चुकीचे आहे. अशी परंपरा आपल्याकडे नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली. मात्र भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणामुळे वातावरण बिघडल्याचा आरोप केला असून गांधीचे भाषण त्यांची चुकीची माहिती प्रदर्शित करणारे होते. त्यांना भारतातील धर्मग्रंथांची माहिती नाही. तरी ते त्यांचा संदर्भ देतात, असा प्रत्यारोप गांधींवर केला.

Advertisement
Tags :

.