उद्धव ठाकरेंच्या गद्दारीमुळे राजकारणाचा बट्ट्याबोळ
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची टीका
वैभववाडी / प्रतिनिधी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनादेश हा महायुतीच्या बाजूने होता. परंतु उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली. हिंदुत्वाला मूठमाती देत काँग्रेसशी हात मिळवणी केली. उद्धव ठाकरे यांच्या गद्दारीमुळेच राजकारणाचा बट्ट्याबोळ झाला, अशी टीका भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी वैभववाडी येथे केली.या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना या मतदारसंघातून 60 हजार मतांचे मताधिक्य द्या. जिल्ह्याला यापुढे बाहेरून पालकमंत्री आणावा लागणार नाही. पालकमंत्री आपलाच असेल असा विश्वास ही विनोद तावडे यांनी व्यक्त केला.महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचार सभे प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी आमदार प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तावडे म्हणाले की,केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ जवळपास 60 टक्के जनतेला मिळाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक योजना आज सुरू आहेत. यातील अनेक योजनांचे लाभार्थी विरोधक राहुल गांधी देखील आहेत.विनोद तावडे यांनी केंद्र शासनाच्या अनेक योजनांची यादीच वाचून दाखवली. 18 कोटी जनतेला आज मोफत धान्य, 1 कोटी 64 लाख लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्वला गॅस, 25 कोटी कुटुंबं आज दारिद्र्यरेषेतून बाहेर आली आहेत, असे सांगितले.