विनफास्ट भारतात विस्तारावर भर देणार
नवी दिल्ली : व्हिएतनाम येथील इलेक्ट्रीक वाहन निर्माती कंपनी विनफास्ट भारतात आपल्या व्यवसायाचा दमदार विस्तार करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात अलीकडेच कंपनीने 15 राज्यांबरोबर करार केला असून याअंतर्गत 50 इलेक्ट्रीक दुचाकी शोरुम्स सुरु करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.
भारतीय बाजारात दुचाकी क्षेत्रात कंपनी उतरत असून व्यवसायाचे जाळे अधिक जोमाने वाढवण्याचा विचार केला जात आहे. 15 राज्यात 34 शहरांमध्ये 50 हून अधिक इमोटरसायकल शोरुम्स कंपनीला सुरु करायची आहेत. यामध्ये दिल्ली -एनसीआर, राजस्थान व पंजाब ही उत्तरेतील राज्ये, मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेश या मध्य भारतात, महाराष्ट्र व गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा, तामिळनाडू, केरळ व आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल व ओडिशा या राज्यांमध्ये येत्या काळात कंपनी शोरुम्स उघडणार आहे.
काय म्हणाले एमडी
यासंदर्भात माहिती देताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक वो थी कॅम टू यांनी म्हटले की, भारत ही कंपनीसाठी विस्तारासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. इलेक्ट्रीक दुचाकींच्या विस्तारासाठी येथे असणाऱ्या संधींचा विचार केला जात आहे. भागीदारीतून कंपनीला येथे जास्तीत जास्त हिस्सेदारी प्राप्त करायची आहे. येथे इलेक्ट्रीक दुचाकींची वाढती मागणी लक्षात घेता व स्पर्धा पाहता कंपनी येणाऱ्या काळात आपला व्यवसाय अधिक विस्तारण्यावर भर देईल.
