‘रंगबाज : द बिहार चॅप्टर’मध्ये विनीत
एकीकडे बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी राजकारण तापलेले असताना दुसरीकडे पडद्यावरही याचे पडघम दिसून येणार आहेत. ओटीटीवर ‘रंगबाज’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात हारुन शाह अली बेगच्या जीवनाला दाखविण्यात येणार आहे. ही सीरिज ओटीटीवर स्ट्रीम होणार आहे. हारुन शाह अली बेग या इसमावर लोक अत्यंत प्रेम करायचे, तर काही जण त्याचा द्वेष करायचे, परंतु त्याला सर्वजण घाबरत होते. या सीरिजमध्ये विनीत कुमार सिंह आणि आकांक्षा सिंह हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. कहाणी बिहारच्या राजकारणावर आधारित आहे.
रंगबाज : द बिहार चॅप्टरचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून विनीत हा बेगच्या भूमिकेत आहे. 20 वर्षे आणि 34 गुन्हे, परंतु कुठल्याही प्रकरणात बेगला लक्ष्य करणारे आरोपपत्र दाखल नसल्याचे यात दाखविण्यात आले आहे. सीरिजचे दिग्दर्शन सचिन पाठक यांनी केले आहे. तर कलाकारांमध्ये विनीत आणि आकांक्षासोबत विजय मौर्या, राजेश तैलंग, प्रशांत नारायणन, गीतांजली कुलकर्णी आणि सोहम मजूमदार दिसून येणार आहेत. झी5 वर ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.