तर तिलारीचे पाणी अडवू !
माडखोल येथील प्रचारसभेत खा .विनायक राऊतांचा गोवा सरकारला इशारा
सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा हजार युवक गोव्यात चालक म्हणून नोकरी करीत आहेत. परंतु ,तेथील भाजपप्रणित प्रमोद सावंत सरकारने या चालकांना गोव्यातीलच ड्रायव्हिंग लायसन्स सक्तीचे केले आहे. गोव्याचे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर चालकांना दंड ठोठावण्यात येत आहे. त्यामुळे सहा हजार युवकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. गोवा सरकारने सिंधुदुर्गातील गोव्यात चालक म्हणून काम करणाऱ्या युवकांना त्रास देण्याचे बंद न केल्यास तिलारीचे पाणी अडवू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी माडखोल येथील प्रचार सभेत दिला. माडखोल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार खा . विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले , तसेच उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,,जेष्ठ नेते विकास सावंत , दिलीप नार्वेकर, समीर वंजारी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हाणेकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शेतकरी नेते वसंत केसरकर, शिवसेनेच्या महीला जिल्हाध्यक्ष जान्हवी सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग समन्वयक अर्चना घारे-परब, माजी जि.प सदस्य मायकल डिसोझा, संदीप कदम, चंद्रकांत कासार, माडखोल माजी सरपंच संजय लाड, शब्बीर मणियार उपस्थित होते.
राऊत यांनी या प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला केला. या जिल्ह्यात नऊ राजकीय हत्या झाल्या. जिल्ह्यात दहशतवाद आणला गेला . लोकांच्या जमिनी धाक दाखवून बळकवण्यात आल्या याचा इतिहास रक्तरंजित असाच आहे. हा इतिहास पुन्हा जिल्ह्यात येऊ नये याची खबरदारी मतदारांनी घेतली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी विकासाचे कोणतेही काम केलेले नाही . आपल्या कुटुंबाचे हित साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपण आणि आपली दोन मुले यांच्या भोवतीच त्यांचे राजकारण फिरत आहे. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज जनतेच्या हितासाठी न करता आपल्या हितासाठी काढले. सिंधुदुर्गातील 42 हजार हेक्टर जमीन राणेंनी वनसंज्ञे खाली आणली. या उलट मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनतेच्या हितासाठी शासकीय मेडिकल कॉलेजआणले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावे सिडकोच्या प्राधिकरण खाली आणण्याचा घाट राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकार नष्ट होऊन सिडकोला मिळणार आहेत. लोकांना घरे बांधण्यासाठी उद्योग आणण्यासाठी सिडकोची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे अधिकार कमी होऊन त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे याला विरोध झाला पाहिजे. आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे . सर्वसामान्य लोकांचे जीवन असह्य झाले आहे. याचा विचार आता लोकांनी केला पाहिजे. मी शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. याउलट शिवसेनेशी गद्दारी करून महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा कट करणाऱ्या मोदी शहांच्या गोटात काहीजण गेले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी मतदार संघातील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचाही समावेश आहे. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करू पाहणाऱ्या भाजपला येथील मतदारांनी या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गातून हद्दपार करावे असे आवाहनही त्यांनी केले . यावेळी प्रवीण भोसले ,अर्चना घारे परब ,विकास सावंत ,संदीप कदम, विवेक ताम्हणकर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने माडखोल पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते .