विनय कुलकर्णींना जन्मठेप
योगीश गौडा हत्या प्रकरण : आमदारपद रद्द : इतर 15 जणांनाही जन्मठेपेची शिक्षा : एका दोषीला 7 वर्षांचा कारावास
त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा हत्या प्रकरणात काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह 16 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एका दोषीला 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बेंगळूरमधील लोकप्रतिनिधी न्यायालयाचे न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी हा आदेश दिला. त्यामुळे विनय कुलकर्णींचे आमदारपदही रद्द झाले आहे.
योगीश गौडा हत्या प्रकरणी लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने बुधवार 15 एप्रिल रोजी 21 आरोपींपैकी आमदार विनय कुलकर्णींसह 17 आरोपींना दोषी ठरविले होते. गुरुवार शिक्षेसंदर्भात दोषी आणि सीबीआयच्या वकिलांचा वाद-युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी शिक्षा सुनावली जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवार 17 एप्रिल रोजी विनय कुलकर्णींसह 16 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली तर 19 वा अपराधी चन्नकेशव टिंगरीकर याला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. चन्नकेशव यांनी धारवाड उपनगर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली होती.
या प्रकरणात आरोप सिद्ध न झाल्याने वासुदेव निलेकणी व सोमशेखर न्यामगौडा या दोन आरोपींची न्यायालयाने बुधवारी मुक्तता केली होती. तर आरोपी क्र. 1 बसवराज मुत्तगी याला माफीचा साक्षीदार ठरविले आहे. तर आरोपी क्र. 12 शिवानंद याने माफीचा साक्षीदार बनून देखील विरोधात जबानी दिल्याने सीबीआयने शिवानंदला पुन्हा आरोपी बनविले आहे.
योगीश गौडांच्या मुलांना 16 लाखांची भरपाई
विनय कुलकर्णी आणि इतरांना गुन्हेगारी कट आणि खूनासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच योगीश गौडा यांच्या मुलांना नुकसान भरपाई म्हणून 16 लाख रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
न्यायालयाच्या आदेशाची प्रत विधानसभा अध्यक्षांकडे
न्यायालयाच्या आदेशामुळे लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 8(4) नुसार विनय कुलकर्णींचे आमदारपद रद्द झाले आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांना पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून या संदर्भात लवकरच अधिकृत आदेश जारी होईल. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार खुनाच्या खटल्यात आमदार दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा जारी झाल्यानंतर त्याचे आमदारपद तत्काळ रद्द होते. आमदार किंवा खासदार फौजदारी प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यानंतर किमान 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाली तर त्यांचे पद तत्काळ रद्द होते.
विनय कुलकर्णींचे आमदारपद अधिकृतपणे रद्द झाल्यानंतर धारवाड विधानसभा मतदारसंघ रिक्त होईल. त्यानंतर निवडणूक आयोग 6 महिन्यांच्या आत तेथे पोटनिवडणूक घेण्याची शक्यता आहे.
शिक्षेनंतरही 6 वर्षे निवडणूक लढविण्यावर निर्बंध
खून प्रकरणांत (आयपीसी सेक्शन 302 किंवा बीएनएस सेक्शन 103) गुन्हा सिद्ध झाला तर किमान जन्मठेप किंवा कमाल मृत्युदंडाची शिक्षा होते. ही शिक्षा दोन वर्षांच्या कारावासापेक्षा अधिक असल्याने खून प्रकरणात दोषी आढळताच आमदारपद रद्द होते. केवळ आमदारपदच रद्द होत नाही तर कारावास अनुभवल्यानंतर सुटका झालेल्या दिवसापासून पुढील 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येत नाही.
विनय कुलकर्णींपुढे पुढील पर्याय कोणता?
लेकप्रतिनिधी न्यायालयाने ठोठावलेल्या शिक्षेला विनय कुलकर्णी हे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. वरिष्ठ न्यायालयाने कारावासाच्या शिक्षेलाच नव्हे तर त्यांच्यावरील दोषी ठरविण्यात आलेल्या आदेशाला स्थगिती दिली तरच कुलकर्णी यांना त्यांचे आमदारपद पुन्हा मिळू शकते. केवळ जामीन मिळाला तर आमदारपद परत मिळू शकत नाही. त्यामुळे आमदार कुलकर्णी उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात लोकप्रतिनिधी न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात अपील करण्याची शक्यता आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
15 जून 2016 रोजी धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा यांच्या सप्तापूर येथील त्यांच्या जीमबाहेर निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणी धारवाड उपनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला होता. मालमत्तेच्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. योगीश गौडा यांच्या कुटुंबीयांच्या मागणीवरून 2019 मध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. नंतर सीबीआयच्या तपासात राजकीय हेतूने योगीश गौडाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आमदार विनय कुलकर्णी यांच्या सहभागाचा संशय होता. 5 नोव्हेंबर 2020 रोजी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी विनय कुलकर्णींना अटक केली. तपास पूर्ण झाल्यानंतर एकूण 21 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. नंतर विनय कुलकर्णींची दोन वेळा जामिनावर मुक्तता झाली होती.
जन्मठेपेची शिक्षा झालेले 16 दोषी.....
विक्रम, कीर्ती कुमार, संदीप, विनायक कटगी, महाबळेश्वर होंगल उर्फ मुदक, संतोष सवदत्ती, एम. दिनेश, एस. अश्वथ, के. एस. सुनील, नजीर अहमद, शाहनवाज, के. नूतन, सी. हर्षित, विनय कुलकर्णी, चंद्रशेखर इंडी उर्फ चंद्रु माम, विकास कलबुर्गी
7 वर्षांची शिक्षा झालेला दोषी....
चन्नकेशव टिंगरीकर
माफीचा साक्षीदार
बसवराज मुत्तगी
निर्दोष मुक्तता झालेले दोघे आरोपी
वासुदेव निलेकणी, सोमशेखर न्यामगौडा
धीर सोडण्याची गरज नाही!
न्यायालयाबद्दल मला आदर आहे. भाजपच्या कटामुळे विनय कुलकर्णी अडचणीत आले आहेत. त्यांनी धीर सोडण्याची गरज नाही. राजकारणात असा संघर्ष आवश्यक असतो. येथे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. बी रिपोर्ट सादर झाल्यानंतर सीबीआय तपास करून त्रास देण्यात आला आहे. या षड्यंत्रात विनय कुलकर्णींना गोवण्यात आले आहे. अपील करण्यासाठी त्यांच्याकडे अजून 30 दिवस शिल्लक आहेत.
- डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष