विनय कुलकर्णी यांची उच्च न्यायालयात धाव
प्रतिनिधी/ बेंगळूर
धारवाड जिल्हा पंचायतीचे सदस्य योगीश गौडा यांच्या खून प्रकरणासंबंधी आमदार विनय कुलकर्णी यांनी बेंगळूरच्या लोकप्रतिनिधी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
लोकप्रतिनिधी न्यायालयाने मागील आठवड्यात विनय कुलकर्णी यांना जामीन 8 डिसेंबर रोजी सुनावणीवेळी मंजूर करण्यास नकार दर्शविला होता. सुनावणीवेळी विनय कुलकर्णी यांचे वकील सी. व्ही. नागेश यांनी अधिक प्रत्यक्षदर्शींनी आपले मागील जबाब मागे घेतले आहेत. त्यामुळे चौकशीच्या नावाने याचिकाकर्त्यांना कोठडीत ठेवण्याची गरज नाही, असा युक्तिवाद केला होता. तसेच याचिकेवर त्वरित सुनावणी करून जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली होती.
तर सीबीआयच्या वकिलांनी आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत मागितली. त्यानुसार न्यायालयाने विनय कुलकर्णी यांना जामीन मंजूर करण्यास नकार दर्शवन सुनावणी 18 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आमदार कुलकर्णी हे 13 जून 2025 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत.