Vinay Kore, Ekanath Shinde: जनसुराज्य विरुद्ध शिंदे सेना राष्ट्रवादीत रंगणार सामना?
तालुक्यात पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्व
By : अबिद मोकाशी
पन्हाळा: तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले आहेत. विधानसभेनंतर तालुक्यात महाविकास आघाडी बॅकफूटवर गेली आहे. त्यातच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याने महाविकास आघाडीच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. राज्याच्या राजकारणाचा तालुक्यात फारसा पडत नाही. तालुक्यात पक्षापेक्षा सोयीचे आणि गटातटाच्या राजकरणामुळे महायुतीमधील जनसुराज्य शक्ती पक्षाच्या विरोधात शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट असाच थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
शाहूवाडी आणि करवीर या दोन विधानसभा मतदारसंघात विभागला गेलेल्या पन्हाळा तालुक्यात आ. विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाची मजबूत पकड आहे. तर तालुक्याच्या पश्चिम भागात शिंदेसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. पूर्व भागात माजी आमदार सत्यजीत पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा मोठा गट आहे. मागच्या निवडणुकीत तालुक्यात 6 पैकी सातवे, कोडोली, कोतोली या 3 जिल्हा परिषदेच्या मतदार संघात जनसुराज्य शक्ती पक्षाने विजय मिळवला होता. तर पन्हाळा पंचायत समितीवर बारा पैकी आठ जागा जिंकत एकहाती सत्ता संपादन केली होती.
त्यावेळी जिल्हा परिषदेच्या पोर्ले तर्फ ठाणे मतदार संघात जनसुराज्यच्या उमेदवाराला आस्मान दाखवत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी आपली पुतणी प्रियांका पाटील यांच्या रुपाने विजयी गुलाल लावला होता. यातंर्गत येणाऱ्या दोन पंचायत समिती गणात मात्र जनसुराज्यने विजय मिळवला. तर कळे जिल्हा परिषद मतदार संघात झालेल्या तिरंगी लढतीत नरके यांचे समर्थक सर्जेराव पाटील यांनी जनसुराज्यचे युवराज बेलेकर, काँग्रेसचे संदीप नरके यांना पराभवाची धूळ चारली होती. तसेच या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती गणात देखील आमदार चंद्रदीप नरके यांनीच बाजी मारली होती. तर यवलूज जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या कल्पना चौगुले यांनी विजय खेचून आणत भाजपने देखील तालुक्यात ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले होते. तर पंचायत समितीच्या गणात पाडुरंग खाटीक हे नरके गटाचे तर संजय माने हे जनसुराज्यकडून विजयी झाले होते.
संघर्ष कायम राहणार की वाद मिटणार तालुक्यात सध्या तरी महाविकास आघाडी बॅकफूटवर असल्याने महायुतीतील जनसुराज्यच्या विरोधात शिंदेसेना व राष्ट्रवादी यांच्यातच सामना होण्याची शक्यता आहे. या दोघांना महाविकास आघाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांची साथ मिळण्याची शक्यत दिसतेय. राहुल पाटील हे आ. नरके यांचे पारंपरिक विरोधक असल्याने तालुक्याच्या पश्चिम भागात नरके विरुद्ध पाटील गटात संघर्ष कायम राहणार की वाद मिटणार याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. पण ाावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर सुवर्णमध्य काढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जनसुराज्यच्या विरोधात मात्र शिंदेसेना व राष्ट्रवादी एकवटणार असल्याची चिन्हे असल्याने पन्हाळा तालुक्यात अटीतटीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत. महायुतीमुळे कट्टर विरोधक एका पंगतीत तालुक्यात महायुतीमुळे विरोधक एका पंगतीत दिसत असले तरी, राज्याच्या राजकारणाचा फारसा फरक तालुक्यात जाणवत नाही.
तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रत्येक गावात गट सक्रिय आहेत. याउलट आमदार चंद्रदीप नरके यांचा तालुक्याच्या पूर्व भागात संपर्क कमी आहे. पण बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर यांचा चांगला संपर्क आहे. त्यातच आता काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेले स्वर्गीय आ. पी. एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची वाट धरली आहे. तर उद्धव सेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर यांचे आणि आमदार नरके यांचे असणारे सख्य, तर बाबासाहेब पाटील आणि सरुडकर यांची राजकीय मैत्री तर सर्वश्रुत आहे. तर काँग्रेसचे नेते व गोकुळचे संचालक अमरसिंह पाटील यांनी विनय कोरे यांच्याशी केलेल्या राजकीय वाटाघाटीमुळे तालुक्यात पक्षापेक्षा सोयीचे आणि गटातटाच्या राजकारणाची किनार पाहायला मिळते.
भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
तालुक्यात भाजपाची ताकद कमी असली तरी भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती पाटील यांनी ज्नसंपर्क वाढविला आहे. विधानसभेला तर शाहुवाडी-पन्हाळा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या रुपाने भाजपाने तालुक्यात चांगले पक्षसंघठन वाढविले आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेला त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तर यवलूज मतदार संघात भाजपचे के. एस. चौगुले यांच्या गटाकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. कोणाबरोबर वाटाघाटी करायची की स्वतंत्र लढायचे याचे पत्ते अद्याप खुले केले नसल्याने भाजपच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.