For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Konkan News: विनती कंपनीत भीषण स्फोट, कामगाराचा मृत्यू

05:11 PM Jul 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
konkan news  विनती कंपनीत भीषण स्फोट  कामगाराचा मृत्यू
Advertisement

                                                           खेडेकर कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

खेड: तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक कंपनीत शनिवारी सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर (40, रा. घाणेखुंट-खेड) या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून खेडेकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

समीर खेडेकर हा कंपनीत कायमस्वरुपी पदावर कार्यरत होता. शनिवारी तो एकटाच कार्यरत असताना कंपनीतील बॉयलरच्या एयर प्री हिटरमधील दाब वाढल्याने स्फोट होवून गंभीर जखमी झाला.

Advertisement

उपचारासाठी तातडीने कंपनी व्यवस्थापनाने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले असता त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

समीर खेडेकर गेल्या 10 वर्षांपासून कंपनीत कार्यरत होता. त्यांच्या अकाली निधनाने घाणेखुंट गावावर शोककळा पसरली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश कांबळे यांचे ते जावई होते.

Advertisement

आढावा बैठक सुरु असतानाच दुर्घटना

खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी लोटेतील उद्योग भवन येथे एमआयडीसीतील वाढते अपघात आणि प्रदूषण तसेच स्थानिक रोजगाराच्या प्रश्नांवर आढावा बैठक सुरू होती.

बैठकीस सर्व उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व पोलीस उपस्थित होते.

या दरम्यानच विनती ऑरगॅनिक कंपनीत झालेल्या स्फोटात समीर खेडेकर याला हकनाक प्राणास मुकावे लागले. एमआयडीसीतील वाढते अपघात ही चिंतेची बाब बनली आहे.

Advertisement
Tags :

.