जैवविविधता जपण्यासाठी गावांनी पुढाकार घ्यावा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : पारंपरिक मिठागरांना पुनर्जीवन देणार ,जैवविविधता प्रोसेसिंग युनिटचे उदघाटन
डिचोली : जैवविविधता राखून ठेवणे ही वैश्विक जबाबदारी आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. सह्याद्री पट्ट्यातील अनेक वनस्पती नष्ट होत चालल्या आहेत. जलस्रोतांची बचत व निसर्ग वाचविण्यासाठी प्रयत्न करताना प्लास्टिकचा वापर कमी व स्वच्छता हा मंत्र अंमलात आणल्यास जैवविविधता व त्यातील सर्व घटकांचे रक्षण होणार आहे. गोव्याला वैश्विक जैवविविधता राज्य बनविण्यासाठी योग्य नियोजन व त्याप्रमाणे अंमलबजावणी प्रत्येक गावातील जैवविविधता समितीने करायला आतापासूनच सुरू करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी रवींद्र भवनात केले.
जैवविविधता दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिध्द नेत्रचिकित्सक डॉ. श्रीधर ठाकूर, जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम, सांखळीच्या नगराध्यक्ष सिध्दी प्रभू, डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, अधिकारी लेवीनसन्स मार्टिन, कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई, पर्यावरण सचिव सचिन देसाई, पर्यावरणतज्ञ अर्चना गोडबोले आदींची उपस्थिती होती.
आजपासून सात विविध जैवविविधता प्रोसेसिंग युनिट केंद्रे उघडत असून त्याद्वारे महिलांना उपजिविकेचे साधन आम्ही देऊ शकतो वृक्षारोपण करून गोव्यातील सर्व भागांना हरित छताखाली आणायला हवे. खाण खंदकातही हिरवळ तयार व्हायला हवी. त्यासाठीही पुढाकार घ्यावा. स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेला जैवविविधताही हातभार लावत आहे. गोव्यातील गावठी मिठाची मिठगरे पुनऊज्जीवन करण्यासाठी जैवविविधतेच्या माध्यमातून सरकार मदत करणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.
गोव्यातील जैवविविधता महान
गोव्यातील जैवविविधता व नैसर्गिक अधिवास हा महान आहे. केरळ, महाराष्ट्र, लडाख, तेलंगणा, हरियाणा या राज्यातील जैवविविधता मंडळे गोव्यात येऊन अभ्यास करून गेले. यावरूनच गोव्याच्या जैवविविधतेचा स्तर वाढल्याचे लक्षात येते. याच अनुषंगाने पर्यावरणपूरक व जैवविविधतेचा दृष्टीने पर्यटन तयार व्हायला हवे. गोव्यात गोवेकरांच्या नर्सरी तयार व्हाव्यात, जेणेकरून रोपट्यांच्या माध्यमातून गोव्यात कोणत्याही प्रकारची कीड व रोग गोव्यात येऊ नये. यासाठीही गोवेकरांनी पुढाकार घ्यावा. हरित भविष्य पाहताना युवांना बरोबर घेऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले. या सोहळ्यात कृषी व पर्यावरण पातळीवर भरीव कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त रवींद्र भवनमध्ये विविध नैसर्गिक उत्पादनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी फेरफटका मारून पाहणी केली.