तेरवण - मेढे रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आमरण उपोषण छेडू
ग्रामस्थांचा निवेदनाद्वारे इशारा
दोडामार्ग - वार्ताहर
तालुक्यातील तेरवण - मेढे रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी तेरवण येथेच आमरण उपोषण छेडण्याचा इशारा तहसीलदार दोडामार्ग यांना तेरवण ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे एक निवेदनही तेरवण ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल पोवार यांच्याकडे सादर केले आहे.
दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, तेरवण ते तेरवण मेढे रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. हा रस्ता पूर्ण झाल्यास ग्रामस्थांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. शिवाय तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी ग्रामस्थांना सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. अन्यथा येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी रोजी तेरवण येथे उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दिलेल्या निवेदनावर संतोष गवस, नामदेव गवस, नारायण गवस, सुनील गवस, दीपक माणगावकर, शंकर गवस, दत्ताराम कांबळे, महेंद्र नाईक, पुंडलिक गवस, सदाशिव गवस आदी अनेकजणांच्या सह्या आहेत.