म्हापण ते वेंगुर्ले रस्त्याच्या उडाल्या ठिकऱ्या
सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष ; डांबरीकरण न केल्यास ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
म्हापण / प्रतिनिधी
सागरी महामार्गावरील म्हापण ते वेंगुर्ले रस्त्याची प्रचंड दूरावस्था झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्यात आले नाही तर १ मार्च रोजी म्हापण तिठा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा म्हापण पंचक्रोशीतील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाची प्रत आमदार दीपक केसरकर यांनाही देण्यात आली आहे . म्हापण ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच गुरुनाथ मडवळ यांच्यासह ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,आम्ही म्हापण पंचक्रोशीतील ग्रामस्थ असून आमच्या गावातून रेडी - रेवस सागरी महामार्ग जातो. सदर मार्गावरील म्हापण बाजारपेठ ते वेंगुर्ले यादरम्यानचा रस्ता मागील दोन वर्षापासून नादुरुस्त झाला आहे. त्यावरून प्रवास करणे धोकादायक व त्रासदायक बनले आहे. सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत तसेच डांबरीकरण करण्याबाबत आपल्यासह वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार लेखी निवेदन देऊन तसेच प्रत्यक्ष भेटून दुरुस्तीची मागणी केली होती . आपण दुरुस्ती व डांबरीकरण करण्याचे आश्वासन देऊनही डांबरीकरण न केल्याने रस्ता आणखीनच खराब झालेला आहे त्यामुळे आम्ही व्यतीत झालो आहोत. येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करावे अन्यथा १ मार्च रोजी आम्ही म्हापण तिठा येथे सकाळी ९ वाजल्यापासून आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर संजोग परब ,चंद्रकांत घाडी , जगदीश म्हापणकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
रस्त्याच्या झाल्या ठिकऱ्या ठिकऱ्या
सागरी महामार्गावरील म्हापण तिठा ते केळुस यादरम्यानच्या रस्त्याच्या ठिकऱ्या झाल्या आहेत . दुचाकी सोडाच पण चार चाकी व रिक्षाही चालवणे खूप मुश्किल झाले आहे. यामुळे लोकांना प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील डांबराचा अर्ध्याहून अधिक भागातून उकडून गेल्याने रस्ता उंच सकल झाला आहे. त्यामुळे वाहने चालविणे धोकादायक ठरत आहे. याबाबत वाहन चालकांनाही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
विमानतळाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग वेंगुर्ले ते गोवा हद्दीवरून विमानतळाकडे जाणारा हा सागरी मार्ग महत्त्वाचा असून या रस्त्याची दुरावस्था झाल्याने विमानतळाकडे जाणारे प्रवासी तसेच विमानतळावरून उतरून नंतर गोव्याच्या दिशेने जाणारे पर्यटकही या मार्गावरून आता प्रवास करण्यास धजावत नाहीत एवढी वाईट स्थिती या मार्गाची झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी या विषयात तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे डांबरीकरण सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.