For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | पाटगाव-कडगाव येथे केदारलिंग देवस्थान जमिनीवर ग्रामस्थांचा ताबा

04:31 PM Mar 04, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   पाटगाव कडगाव येथे केदारलिंग देवस्थान जमिनीवर ग्रामस्थांचा ताबा
Advertisement

                              दोन वर्षांच्या वादानंतर ग्रामस्थ आक्रमक

Advertisement

पाटगाव -भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील केदारलिंग देवस्थान जमिनीचा वाद चिघळला असून काल ग्रामस्थांनी जमीन ताब्यात घेतली. यावेळी आबाल वृद्धांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गेली दोन वर्षे मंदिराभोवतालची जागा यात्रा भरवण्याकरता मिळावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जमिनीची मागणी केली होती. त्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने देवस्थान जमिनीचा ताबा स्थानिक उपसमितीस देण्यास दिरंगाई केली. यामुळे काल ग्रामस्थांनी मंदिरात बैठक बोलावली होती. त्यावेळी ग्रामस्थांनी देवस्थान समिती जाणीवपूर्वक विलंब लावत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करत जमिनीचा ताबा घेतला. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता.

Advertisement

काल सकाळी अकरा वाजता ग्रामस्थ केदारलिंग मंदिरासमोर जमा झाले. यावेळी देवस्थान उपसमितीने देवस्थान जमिनीची ताबापट्टी न झाल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे या वर्षी देखील सर्व सण, उत्सव रद्द करण्यात आल्याचे सांगितले. गेली दोन वर्षे या वादामुळे सण, उत्सव रद्द झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थंनी कोणत्याही परिस्थितीत आजच ताबा घेण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्षात उपस्थित शेकडो महिला व पुरुषांनी जमीन ताब्यात घेतली.
गेली दोन वर्ष ग्रामस्थ व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात देवस्थान जमीनबाबत वाद सुरु आहे.

यामुळे गावातील सर्व धार्मिक उत्सव दोन वर्ष बंद आहेत. यावर्षीची यात्राही रद्द करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी दाद मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी कडगाव येथील देवस्थान जमिनीपैकी १ हेक्टर ७२.९० आर जमीन देवस्थान स्थानिक उप समितीकडे मंदिर जीर्णोद्धार व भाविकांच्या इतर सोयी सुविधांसाठी देण्याचा आदेश दिला होता. तसेच जमीन प्रशासनाने मोजणी करून त्याचा कच्चा नकाशा तयार करावा व सदर जमीन उपसमितीला देण्यात यावी असे सूचित केले होते. परंतु पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई केली. अखेर ग्रामस्थांनी मंदिराशेजारील जमीन ताब्यात घेतली.

Advertisement
Tags :

.