किटदाळ येथे प्रस्तावित दारू दुकानाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
दुकान सुरू करण्यावर बंदीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : तरुण पिढी व्यसनाधीन होण्याची भीती व्यक्त
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील मुन्नोळी शेजारील किटदाळ येथे दारू दुकान सुरू करण्यात येत आहे. मात्र याला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असला तरी संबंधितांकडून सर्व परवाने मिळविले असल्याने दुकानासाठी बांधकामही करण्यात येत आहे. दारू दुकान सुरू झाल्यास ग्रामस्थांसह तरुण पिढी व्यसनाधीन होणार असून कुटुंबे उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे. ग्रामस्थांना कोणत्याही गोष्टीचा मोह होऊ नये, यासाठी किटदाळ येथे चहाचे दुकानदेखील नाही. अशातच दारू दुकान सुरू झाल्यास परिस्थिती गंभीर होण्याचा धोका आहे. यासाठी दुकान सुरू करण्यावर बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात, किटदाळ गावात प्रस्तावित दारू दुकानावरून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांनी सर्व आवश्यक परवानग्या मिळविल्याचे सांगत दुकानासाठी बांधकाम सुरू केले असले तरी गावातील नागरिकांनी या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. दारू दुकान सुरू झाल्यास गावातील सामाजिक वातावरण बिघडण्याबरोबरच तऊण पिढी व्यसनाधीन होईल आणि अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होतील, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषत: शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवकांवर याचा विपरित परिणाम होणार असून दारू सहज उपलब्ध झाल्यास युवक व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्मयता आहे.
त्यामुळे कौटुंबिक व सामाजिक वादाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते, अशी चिंता महिलांनी व्यक्त केली. गाव शांतताप्रिय असून येथे धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण आहे. गावात साधे चहाचे दुकान नसून अशाठिकाणी दारू दुकान सुरू करणे हे गावाच्या संस्कृतीला बाधा आणणारे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालणे आवश्यक आहे. गावातील तऊणांचे भविष्य वाचविण्यासाठी आणि सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी दारू दुकान सुरू करण्यावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली.