For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गस्तीच्या आश्वासनाअंती तळाशील ग्रामस्थांचे धरणे आंदोलन स्थगित

11:50 AM Aug 16, 2025 IST | अनुजा कुडतरकर
गस्तीच्या आश्वासनाअंती तळाशील ग्रामस्थांचे धरणे आंदोलन स्थगित
Advertisement

वाळू उपशा विरोधात ग्रामस्थांचे आंदोलन होते सुरु

Advertisement

आचरा प्रतिनिधी

कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या वाळू उपसा सुरु असून त्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त तळाशील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या पूर्व इशाऱ्यानुसार स्वातंत्र्य दिनी तळाशील जेटी येथे धरणे आंदोलन छेडले. तळाशील खाडी किनारी अनधिकृत वाळू उपशावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाचे पथक गस्त घालून कारवाई करेल, अशा आश्वासनाचे तहसीलदार वर्षा झाल्टे यांचे लेखी पत्र सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर तळाशील ग्रामस्थांनी धरणे आंदोलन स्थगित केले केले आहे अशी माहिती माजी सरपंच संजय केळूसकर यांनी दिली. मात्र, गस्त घातली न गेल्यास पुन्हा आंदोलन छेडू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.कालावल खाडीपात्रात तळाशील रेवंडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरित्या वाळू उपसा सुरु असून त्यावर कारवाई होत नसल्याने तळाशील ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष संजय केळुसकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दोन दिवसापूर्वी मालवण तहसील कार्यालयात धडक देत प्रांतधिकारी व तहसीलदार यांना जाब विचारला होता. तसेच १५ ऑगस्ट पर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दिला होता. त्यावेळी प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी ज्या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा सुरू आहे, तेथे महसूल, पोलीस आणि बंदर विभागाचे संयुक्त पथक कार्यरत ठेवत कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. मात्र या आश्वासनाचे कोणतेही लेखी पत्र न मिळाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्धार कायम ठेवत आज स्वातंत्र्यदिनी सकाळी १०.३० वाजल्यापासून आंदोलन सुरु केले. पथक नियुक्ती बाबत दिलेल्या आश्वासनाचे लेखी पत्र मिळावे, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी लावून धरली.सायंकाळी साडे चार वाजता ग्रामस्थांना तहसीलदारांचे लेखी पत्र प्राप्त झाले. त्यानुसार तळाशील येथील खाडीतील अनधिकृत वाळू उपशावर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने दि. १६ ऑगस्ट पासून ते १५ सप्टेंबर पर्यंत तळाशील जेटीवर सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गस्त घालण्यासाठी स्थिर पथक नेमण्यात आल्याचे आश्वासन तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी पत्रातून दिले. तसेच या पथकासाठी अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले असून त्यांनी नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून अनधिकृत वाळू उपशाची व वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करावी अशी सूचना तहसीलदारांनी केली आहे. हे लेखी पत्र प्राप्त झाल्याने तळाशील ग्रामस्थांनी आपले उपोषण स्थगित केले. मात्र तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.