For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिंगुळीतील कचरा डेपो जागेला ग्रामस्थांचा विरोध

11:55 AM Jan 01, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पिंगुळीतील कचरा डेपो जागेला ग्रामस्थांचा  विरोध
Advertisement

गावाच्या मध्यवर्ती व लोकस्तीत प्रकल्प ; संबंधित विभागांना निवेदन देत उपोषणाचा इशारा

Advertisement

कुडाळ -

पिंगुळी - देऊळवाडी येथे पिंगुळी ग्रामपंचायत ते श्री देव रवळनाथ मंदिर रस्त्याला लागून प्रस्तावित कचरा डेपो व प्लास्टिक विल्हेवाट प्रकल्पाच्या जागेला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत तेथील ग्रामस्थांनी कुडाळचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सदरचे ठिकाण हे प्रामुख्याने पिंगुळी गावातील मध्यवर्ती व लोकवस्तीचे ठिकाण असून प्रकल्पासाठी ही जागा निवडणे पूर्णपणे चुकीचे ठरणार आहे. त्यासाठी आमचा तीव्र विरोध कायम राहणार असून आम्ही निषेध करीत आहोत.तसेच प्रकल्पाच्या त्या जागेला विरोध म्हणून 26 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पिंगुळी - देऊळवाडी येथे प्रस्तावित कचरा डेपो व प्लास्टिक विल्हेवाट प्रकल्प होत असल्याचे तेथील ग्रामस्थांना समजताच त्यांनी विरोध दर्शविला आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी ग्रामस्थांच्यावतीने कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांना उपविभाग प्रमुख दीपक धुरी, चेतन राऊळ, संग्राम धुरी, जयराम धुरी ,दिपक राऊळ , कपिल म्हापसेकर, शार्दुल राऊळ, केतन शिरोडकर आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, पिंगुळी ग्रामपंचायत ते श्री देव रवळनाथ मंदिर रस्त्यास लागून प्रस्तावित कचरा डेपो व प्लास्टिक विल्हेवाट प्रकल्प होणार असल्याचे व त्याकामी गटविकास अधिकारी यांनी भूमीपूजन केल्याबाबत अनपेक्षित रित्या आमच्या निदर्शनास आले आहे.सदर प्रकल्पाची यापूर्वी कोणतीही कल्पना ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. तसेच स्थानिक प्रभागातील लोकांना विश्वासात न घेता अचानक रित्या सदर ठिकाणी प्रकल्प करण्यात येत आहे,अशी नाराजी व्यक्त केली असून वस्तुतः स्थानिक लोकांना विचारात घेऊन या गोष्टी होणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले नाही. तसेच ग्रामसभेमध्ये देखील सदर विषय घेण्यात आला नाही, याकडे लक्ष वेधले आहे.सदरचे ठिकाण श्री देव रवळनाथ मंदिरापासून १०० मीटर अंतरावर आहे. तसेच सदर ठिकाणापासून अंगणवाडी व प्राथमिक शाळा अवघ्या १०० मीटरवर आहे. सदरचे ठिकाण हे प्रामुख्याने पिंगुळी गावातील मध्यवर्ती लोकवस्तीचे ठिकाण आहे. सदरच्या प्रकल्पाचे ठिकाण हे श्री देव रवळनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागून असल्याने या मंदिराकडे जाताना भाविकांनी दुर्गधीचा त्रास सहन करावा लागणार आहे. सदरचा परिसर हा अतिशय नयनरम्य व पर्यटनाला अनुकूल असा आहे. आजूबाजूला श्री देव रवळनाथ मंदिर, प.पू.राऊळ महाराज मठ अशी पर्यटन ठिकाणे आहे. अशा ठिकाणी प्रस्तावित होणाऱ्या प्रकल्पामुळे प्रदूषण होऊन त्यामुळे आजूबाजूचे परिसर व पर्यटनावर परिणाम होणार आहे.असे प्रकल्प हे लोकवस्ती पासून व रहदारीपासून दूर असणे आवश्यक आहे.तशा जागा पिंगुळी गावात उपलब्ध असताना वर नमूद ठिकाणी प्रकल्प होणे अयोग्य आहे.तसेच श्री रवळनाथ मंदिरामध्ये ये - जा करणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये.यासाठी याच ठिकाणी अट्टाहासाने प्रकल्प व्हावा ,अशी सरपंच तथा ग्रामपंचायत पिंगुळी यांची नक्कीच इच्छा नसणार आहे याची खात्री आहे.
तसेच सदरचे ठिकाण हे प्रामुख्याने गावाच्या मध्यवर्ती आहे. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ सदर प्रकल्पाला जाहीर विरोध करणार असून त्यासाठी आवश्यकते सर्व पर्याय वापरणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या जागेची निवड केल्याने आम्ही निषेध करीत असून 26 जानेवारी रोजी उपोषण करणार आहोत, असा इशाराही दिला आहे. गटविकास अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी , पोलीस निरीक्षक व पिंगुळी सरपंच यांना निवेदन दिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.