सर्कल,फ्लायओव्हरसाठी झारापला ग्रामस्थांचे उपोषण
महामार्ग प्राधिकरणच्या विरोधात संतप्त भावना ; लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
कुडाळ -
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर झाराप - तिठा येथे क्रॉसिंगसाठी असलेला मिडलकट बंद करण्यात आला.मात्र,तेथे पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही.त्यामुळे तेथे वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी सर्कल किंवा फ्लायओव्हर उभारण्यात यावे, यासह अन्य मागण्यांबाबत महामार्ग प्राधिकरण विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने अखेर सोमवारी सकाळी झाराप ग्रामस्थानी झाराप - तिठा येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. ग्रामस्थांनी महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणाबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. दरम्यान, कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी उपोषणकर्त्यांशीं चर्चा केली.तसेच या सर्व मागण्या तांत्रिक बाबींशी संबंधित असल्याने तांत्रिक बाबी तपासून त्या पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून तातडीने 'रंबलर बसविण्याचे आदेश देण्यात येत आहे,असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग उपविभाग ( सावंतवाडी ) सहाय्यक कार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे उपोषणकर्त्यांना दिले.त्यानंतर सदर उपोषण मागे घेण्यात आले. या महामार्गावर झाराप - तिठा येथे क्रॉसिंगसाठी असलेला मिडलकट बंद करण्यात आला .मात्र, पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्याने पादचारी ग्रामस्थ व वाहनधारकांची गैरसोय होत आहे. सर्व्हिस मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहतुक सुरू असून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. मिडलकट बंद करून दोन ते अडीज महिने उलटले, तरी पादचारी ग्रामस्थ व वाहनधारकांना पर्यायी व्यवस्था आजही करण्यात आली नाही. तो मिडलकट पुर्ववत करण्यात यावा.वाहनाची वेगमर्यादा कमी करण्यासाठी रम्बलर बसविण्यात यावेत. सर्कल किवा फ्लायओव्हरचे काम सुरु करण्यात यावे. त्या सर्कल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवस्मारक उभारण्यात यावे.या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताकदिनी झाराप - तिठा येथे बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तेथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश बिडये व ग्रामस्थांनी दिला होता. त्यानुसार काल सकाळी रुपेश बिडये यांच्यासह ग्रामस्थांनी मनाई आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत सदर उपोषण सुरू केले. झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, गजानन हळदणकर, नितीन गोलतकर, भास्कर परब,पप्या बिडये,सुधाकर मांजरेकर, पांडुरंग डिचोलकर, राजेंद्र तेंडोलकर,समीर हळदणकर,राजन सामंत, सुभाष माणगावकर, हरिचंद्र डिचोलकर, अजय डिचोलकर, मधुकर दाभोलकर व झाराप पंचक्रोशीतील ग्रामस्थ व व्यावसायिक उपस्थित होते.कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. झाराप तिठा हे जंक्शन आहे. या ठिकाणी वाहनाची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. येथे वारंवार भीषण अपघात झाले असून सदरचे ठिकाण मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्ग प्राधिकरण याकडे गांभीर्याने पाहत नाही.या विभागाच्या बेजबाबदार कारभाराला आम्ही कंटाळलो आहोत. पुन्हा तेथे अपघात घडून संतप्त जमावाने कायदा हातात घेतल्यास जनतेला जबाबदार धरण्यात येऊ नये, अशा संतप्त भावना उपोषणकर्त्यांनी व्यक्त केल्या. दरम्यान,आपल्या निवेदनाद्वारे प्राप्त झालेल्या मागण्या या कार्यालयाला प्रथमच प्राप्त झाल्या आहेत. आपल्या या सर्व मागण्या तांत्रिक बाबींशी संबंधित असल्याने तांत्रिक बाबी तपासून त्या पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील. या संदर्भात होणारा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा वेळोवेळी आपणास कळविण्यात येईल.तसेच झाराप तिठा येथील जंक्शनवर अपघातांचे गांभीर्य लक्षात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून तातडीने रम्बलर बसविण्याचे आदेश देण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर आपल्या मागण्यांची दखल घेतली जात असल्याने आपण आपले प्रस्तावित उपोषण मागे घ्यावे, असे आश्वासन सहाय्यक कार्यकारी अभियंता( राष्ट्रीय महामार्ग उपविभाग,सावंतवाडी ) यांनी पत्राद्वारे दिले .ते पत्र तहसीलदार श्री पाटील यांनी श्री.बिडये यांच्याकडे सुपूर्द केले.त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.