तुडये ग्रामस्थांचे बससाठी उपोषण
बेळगाव डेपो मॅनेजरच्या आश्वासनानंतरही उदासीनता
वार्ताहर/तुडये
बेळगाव शहर बस आगाराने तुडये गावासाठी राकसकोपच्या बस फेऱ्या तुडयेपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन देऊनही सुरू न केल्याने अखेर गुरुवारी सकाळपासून ग्रामस्थांनी सरपंच विलास सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषणाला येथील बस थांब्यावर सुरुवात केली आहे. जोपर्यंत बससेवा सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार आहे. चंदगड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला वसलेला तुडये परिसर हा बेळगाव तालुक्याला लागून आहे. येथील ग्रामस्थांचा जादातर संपर्क बेळगाव शहराशी आहे. येथील शेती उत्पादने ही बेळगाव बाजारपेठेत पाठविली जातात. विद्यार्थी शिक्षणासाठी बेळगावला जातात मात्र, बससेवा नसल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांची गैरसोय बनली आहे.
राकसकोप, बेळगुंदी गावापासून चालत जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. त्यामुळे राकसकोप गावापर्यंत सुरू असलेल्या बस फेऱ्या तीन किलो मीटर अंतरावरील तुडये गावापर्यंत सोडाव्यात या मागणीचे निवेदन सरपंच विलास सुतार व ग्राम पंचायत सदस्यांनी यापूर्वी अनेकवेळा देऊनही बससेवा सुरू झाली नाही. बेळगाव बस डेपो अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अखेर उपोषण सुरू करण्यात आले आहे. उपसरपंच अशोक पाटील, अरुण पाटील, गणपती कोरजकर, कल्लाप्पा हुलजी, ग्राम पंचायत सदस्य मनोहर कनगुटकर, रेश्मा सुतार, सविता हुलजी, प्रियांका झाजरी, परशराम दळवी, मिथुन पाटील, प्रमोद गुरव, काडपा पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी या साखळी उपोषणात सहभाग घेतला, चंदगड पोलिसांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली.
रास्ता रोकोच्या भीतीने धामणे(एस) बस केली बंद
तुडये येथे रास्ता रोको व साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव बस डेपोने सकाळची व सायंकाळची धामणे (एस)बस सेवा बंद केली. त्यामुळे धामणे येथील विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागली.