गावच्या मंदिरासाठी एकवटले ग्रामस्थ
मच्छे ग्रामस्थांमध्ये उत्साह : जागृत ब्रह्मलिंग मंदिर जीर्णोद्धाराच्या माध्यमातून एकात्मतेचे दर्शन
वार्ताहर/किणये
मच्छे गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. यासाठी गावातील नागरिक एकवटले आहेत. मंदिर जीर्णोद्धाराच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडून येत आहे. दर सोमवारी गावातील प्रत्येक गल्लीच्यावतीने मंदिराजवळ विधिवत पूजा-अर्चा करण्यात येत आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मच्छे गावापासून शेत शिवारामध्ये निसर्गरम्य अशा परिसरात जागृत ब्रह्मलिंग देवस्थान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांनी केला आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्णपणे काळ्या दगडामध्ये करण्यात येणार आहे. मंदिरासाठी सुमारे अडीच कोटी खर्च अपेक्षित असल्याची माहिती देवस्थान पंच कमिटीने दिली आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार असल्यामुळे दर सोमवारी गावातील प्रत्येक गल्लीच्यावतीने गावात मिरवणूक काढून सर्व देवतांची पूजा-अर्चा करून मंदिर परिसरात पूजा करण्यात येत आहे. दर सोमवारी करण्यात येणाऱ्या पूजेच्या कार्यक्रमाला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जीर्णोद्धारासाठी मदत करण्याचे आवाहन
आतापर्यंत गावातील विविध गल्ल्यांमधून 23 लाख रुपये इतका निधी जमा झाला असल्याची माहिती देवस्थान पंच कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे. मात्र मंदिरासाठी अधिक निधी लागणार असल्यामुळे दानशूर व्यक्तींनी या मंदिरासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. सोमवारी मच्छे गावातील महादेव गल्लीच्यावतीने गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गल्लीतील महिला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर ही मिरवणूक ब्राह्मलिंग मंदिर परिसरात आली. त्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत देवस्थान पंच कमिटीचे उपाध्यक्ष सुरेश लाड यांनी केले.
नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण
यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली. मंदिर उभारण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे सांगण्यात आले. त्यानंतर महाआरती करून भाविकांसाठी तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर उभारण्याच्या कार्यासाठी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष चांगाप्पा हावळ, उपाध्यक्ष सुरेश लाड, संजय सुळगेकर, शंकर बेळगावकर, नागेश गुंडोळकर, बसवंत नावगेकर, पिंटू बेळगावकर, निंगाप्पा नावगेकर, शिवाजी चौगुले, अण्णू पाटील, नागो पुजारीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.