आचरा - भंडारवाडी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची परवड
चौथी पर्यंतच्या मुलांना करावी लागतये रोजची पायपीट ; शाळा चालू करण्याची ग्रामस्थांची मागणी
आचरा | प्रतिनिधी
आचरा भंडारवाडी जि. प. शाळा ही पटसंख्येचे कारण देत सन २०२० मध्ये बंद करण्यात आली होती. मात्र तेव्हापासून सदरची शाळा अद्याप बंद आहे. त्यामुळे आचरा भंडारावाडी भागातील मुलांना भंडारवाडी परिसरापासून सुमारे 2 किमी लांब असलेल्या शाळांमध्ये पायपीट करत जावे लागत आहे. तर नव्याने शाळेत दाखल होणारी काही मुले शाळा जवळ नसल्याने अजूनही दाखल झालेली नाहीत या भागातील मुलांची होणारी ही परवड थांबवण्यासाठी प्रशासनाने पुन्हा भंडारवाडी शाळा चालू करावी अशी मागणी स्थानिक पालकांनी केली आहे.
भंडारवाडी शाळेत मुले पाठवण्याची पालकांची हमी
भंडारवाडी प्राथमिक शाळा बंद असल्याने भंडारवाडी, बौद्धवाडी, काझीवाडा भागातील मुलांची गैरसोय होत आहे. सध्या या शाळेच्या परिसरापासून 2 किमीच्या अंतरावर जवळपास शाळा नाही. तसेच या परीसरामध्ये अंगणवाडी मधून पहिलीत जाणारी ०७ मुले आहेत. तसेच इयत्ता दुसरी २ मुले, तिसरी ३ मुले व चौथी २ मुले अशी एकूण १४ मुले असून हि शाळा सुरु झाल्यास उपलब्ध होणारी आहेत. व पालकांनी ही मुले शाळेत पाठविण्याची संमत्ती शिक्षण विभागात दिली असल्याचे पालकांनी सांगितले. या शाळेच्या बाजूलाच अजूनही अंगणवाडी शाळा चालू आहे यातही लहान मुले आहेत. शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी शाळांना जोडणे आवश्यक असलेने शाळा चालू होणे गरजेचे आहे. उद्या ही शाळा चालू न झाल्यास चालू अंगणवाडीला फटका बसणार असल्याचे पालकांनी सांगितले.
चौथी पर्यंतच्या मुलांना करावी लागतये रोजची पायपीट
आचरा भंडारावाडी येथे शाळा चालू नसल्याने या भागातील पहिली ते चौथी पर्यंत शिकणाऱ्या मुलांना भंडारवाडी पासून 2किमी पेक्षा दूरवर असलेल्या गाऊडवाडी, वरचीवाडी येथील प्राथमिक शाळेत जावे लागत आहेत चार महिने पावसाळा व इतर नैसर्गिक आपत्तीमध्येही या छोटया मुलाना जीव धोक्यात घालून पाठवावे लागत असल्याचे पालक सांगत आहेत. भंडारवाडी शाळा बंद करताना ग्रामस्थांनी विरोध केला होता त्यावेळी दुसऱ्या शाळेत मुलाना पाठवण्याठी प्रवास खर्च दिला जाईल असे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते मात्र अद्याप पर्यंत असा कोणताही खर्च पालकांना दिला गेला नाही. शाळा चालू करावी असा ग्रामसभेचा ठरावही शिक्षण विभागास पाठवला गेला असल्याची माहिती स्थानिक पालकांनी दिली.